नगर : सीसीटीव्ही कॅमेरे अन् चारशे पोलिस तैनात | पुढारी

नगर : सीसीटीव्ही कॅमेरे अन् चारशे पोलिस तैनात

नगर; पुढारी वृत्तसेवा : आज गुरुवारी (दि. 30) रामनवमीनिमित्त नगर शहरात निघणार्‍या शोभायात्रेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावर 25 ठिकाणी 55 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सुमारे 400 पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात असणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून श्रीरामनवमी शोभायात्रा सुरू होणार आहे. पारंपरिक रामनवमी मिरवणूक मार्गावरून मिरवणूक काढण्याची परवानगी पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावर वीजप्रवाह खंडित झाल्यास विजेची व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच रामनमवी उत्साहात साजरी व्हावी यासाठी पोलिसांनी तयारी केली आहे. तसेच पोलिसांनी 15 जणांना नोटिसा बजावल्या असून, 95 समाजकंटकांवर तीन दिवसांसाठी तडीपारीची कारवाई केली आहे.

असा आहे पोलिस बंदोबस्त
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक (2), पोलिस निरीक्षक (8), सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक (25), पोलिस अंमलदार (330), एक आरसीपी प्लाटून, एक एसआरपीएफ प्लाटून असा तगडा पोलिस बंदोबस्त रामनवमी शोभायात्रेदरम्यान तैनात असणार आहे.

Back to top button