नाशिक : आरोग्य विद्यापीठ प्राधिकरणासाठी आज मतदान | पुढारी

नाशिक : आरोग्य विद्यापीठ प्राधिकरणासाठी आज मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी शुक्रवारी (दि.17) मतदान घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाने तयारी पूर्ण केली आहे. पात्र मतदारांनी मतदान करून निवडणुकीत विद्यापीठाला साहाय्य करावे, असे आवाहन कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांकरिता सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत मतदान घेण्यात येणार आहे. राज्यात 42 ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित केली असून, तेथे विद्यापीठातील 92 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच 84 कर्मचार्‍यांची केंद्रीय स्तरावर महाविद्यालयामार्फत सेवा उपलब्ध करून घेतली जाणार आहे. अधिकारी व कर्मचारी हे मतपेट्या व मतदान साहित्यासह केंद्रांकडे रवाना झाले आहेत. आयुर्वेद व युनानी विद्याशाखेचे प्राध्यापक वगळता शिक्षक आणि आयुर्वेद व युनानी अभ्यास मंडळातील युनानीची निवडणूक न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगित करण्यात आली आहे. त्याचा कार्यक्रम पुढे जाहीर केला जाईल, असे विद्यापीठाचे विधी अधिकारी अ‍ॅड. संदीप कुलकर्णी यांनी सांगितले. निवडणुकीत विद्यापीठातील विशेष कार्य अधिकारी राजेंद्र नाकवे, संजय कापडणीस, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे, रंजिता देशमुख, शैलजा देसाई, कृष्णा मार्कंड, संगीता जोशी यांच्यासह अन्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा:

 

Back to top button