नगर; पुढारी वृत्तसेवा : गावठी कट्ट्यासह दोन सराईत आरोपींना एलसीबीच्या पथकाने नान्नज (ता.जामखेड) येथून अटक केली आहे. एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस असा सुमारे 31 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. एलसीबीच्या पथकातील हवालदार विश्वास अर्जुन बेरड यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिष ऊर्फ हरिनाथ सुबराव बिरंगळ (रा. सोनेगाव, ता. जामखेड), महेंद्र अभिमान मोहळकर (नान्नज, ता. जामखेड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. गावठी कट्टा व जिवंत काडतूस जवळ बाळगणारे दोन इसम नान्नज शिवारातील नंदादेवी हायस्कुल येथे येणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने वेशांतर करून सापळा लावला होता. काही वेळातच त्याठिकाणी आलेल्या दोन संशयितांना पोलिस पथकाची चाहूल लागल्याने त्यांनी तेथून पळ काढला. पथकाने त्यांचा पाठलाग करून शिताफीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. एलसीबीचे प्रमुख अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार विश्वास बेरड, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, भिमराज खर्से, विनोद मासाळकर यांनी ही कारवाई केली.
दोघेही सराईत गुन्हेगार
आरोपी महेंद्र अभिमान मोहळकर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात जबरी चोरीसह गंभीर स्वरुपाचे 5 गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी हरिष ऊर्फ हरिनाथ सुबराव बिरगंळ याच्यावर जामखेड पोलिस ठाण्यात दुखापत करण्याचा गुन्हा दाखल आहे. .