पाथर्डी : तीर्थक्षेत्र विकासनिधीच्या कामांची होणार चौकशी | पुढारी

पाथर्डी : तीर्थक्षेत्र विकासनिधीच्या कामांची होणार चौकशी

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : शहरातील तीर्थक्षेत्र विकासनिधी अंतर्गत 4 कोटी रूपये खर्चून पाथर्डी पालिकेमार्फत नदी पात्रात सुरु असलेले गटारीचे नियमबाह्य बांधकाम तात्काळ थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले आहेत. या कामाची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती.

राष्ट्रीय महामार्ग 61 ते तीर्थक्षेत्र खोलेश्वर मंदिर ते राज्य महामार्ग 59 रस्त्यालगत गटार बांधकाम कामाची, तसेच तीर्थक्षेत्र विकासनिधी अंतर्गत झालेल्या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे व अ‍ॅड.हरीहर गर्जे यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी याबाबत पालिका मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नदी पात्रात गटारीचे काम सुरू आहे. शहरातील परिट नदीला पावसाळ्यात नेहमी पूर परिस्थिती उद्भवते. असे असताना पालिकेने नदीत गटारीचे काम सुरू केल्याने पुराच्या पाण्याचा फुगवटा होऊन शहरातील कसबा परिसरात पुराचे पाणी घुसून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तीर्थक्षेत्र योजनेचा निधी हा तीर्थक्षेत्रासाठीच खर्च करावा, असे स्पष्ट निर्देश असताना पालिका मुख्याधिकार्‍यांनी हा निधी नदी पात्रातील गटारीसाठी वापरला आहे. कामाची प्रत्यक्ष पाहणी करून तज्ज्ञांकडून चौकशी करून फौजदारी गुन्हा नोंदवावा. चालू काम तात्काळ थांबवावे. अन्यथा उच्च न्यायालय अथवा हरित लवादाकडे दाद मागण्याचा इशारा मुकुंद गर्जे व हरिहर गर्जे यांनी निवेदनात दिला होता.

Back to top button