Dhule ZP : जिल्ह्यातील गट, गणात सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याची शक्यता | पुढारी

Dhule ZP : जिल्ह्यातील गट, गणात सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याची शक्यता

धुळे : पुढारी वृत्तसेवा

Dhule ZP : धुळे जिल्हा परीषदेच्या १५ गट आणि पंचायत समितीच्या ३० गणांच्या जागांच्या पोटनिवडणुकीसाठी रिंगणात असलेलया ११४ उमेदवारांचे नशिब आज मतदान यंत्रात बंद झाले. जिल्ह्यातील गट आणि गणात सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याची शक्यता आहे. सायंकाळी मतदानाची वेळ संपण्यापूर्वी कापडणे गटात अचानक मतदारांनी गर्दी केल्याने त्यांना मतदान केंद्राच्या आवारात प्रवेश देऊन सायंकाळी उशीरापर्यंत मतदानाची संधी देण्यात आली.

धुळे जिल्हा परिषदेमध्ये ( Dhule ZP ) दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवले. यात भाजपाला ५६ पैकी ३९, काँग्रेसला ७, शिवसेनेला ४, राष्ट्रवादीला ३ तर अपक्षांना तीन जागा मिळाल्या होत्या. पण ओबीसीच्या कारणावरून जिल्हा परीषदेच्या  १५ जागा तर पंचायत समितीच्या ३० सदस्यांचे पद न्यायालयाच्या आदेशाने रद करण्यात आले. यानंतर आता या जागांसाठी पोटनिवडणुक होत आहे. यासाठी १५ गटातून ४२ तर पंचायत समितीच्या ३० गणांसाठी ७५ उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने महाआघाडी केली असुन भाजपाने प्रत्येक जागेवर आपले उमेदवार दिले आहेत. आज सकाळपासून जिल्हयातील ५५३ मतदान केंद्रात चोख बंदोबस्तात मतदानास सुरुवात करण्यात आली आहे.

यात धुळे तालुक्यात सर्वाधिक २३५ केंद्र असून साक्री तालुक्यात ९९, शिरपुर तालुक्यात ६३ तर शिंदखेडा तालुक्यात १५६ मतदान केंद्र आहे. या प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी १ शिपाई व एक पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय पोलिसांचे फिरते पथक प्रत्येक केंद्रात भेट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पोटनिवडणुकीसाठी २ लाख ६७ हजार १८२ महीला मतदार तर २ लाख ८३ हजार ६६५ मतदार तसेच ५ इतर मतदार असे एकूण ५ लाख ५० हजार ८५२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. सायंकाळी साडेतीन वाजेपर्यंत जिल्हयात ४६.३७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.

सर्वाधिक मतदान धुळे तालुक्यात ४८ टक्के तर शिंदखेडयात ४७ टक्के, शिरपूर तालुकयात ४३ तर साक्री तालुक्यात ४२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. मतदानाची वेळ सायंकाळी साडेपाच वाजेला संपली. पण कापडणे गटात पाच वाजेपासून मतदारांनी गर्दी केल्याने या मतदारांना मतदान केंद्राच्या आवारात प्रवेश देऊन त्यांना मतदानाची संधी देण्यात आली. तर अन्य तालुक्यातील मतदानाची माहीती संकलीत करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.

अधिक वाचा :

Back to top button