मुंबई; पुढारी ऑनलाईन : Mumbai rave party case : क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. क्रूझवर एकूण १० लोकांवर कारवाई करण्यात आली. पण त्यातील दोन लोकांना सोडून देण्यात आलं. त्यात एका हाय प्रोफाइल भाजप नेत्याच्या मेव्हण्याचा समावेश होता. त्याला सोडून देण्यात आलं, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
ज्या दोन लोकांना सोडून देण्यात आलं त्यांच्याविषयी मी व्हिडिओसह पुरावे देणार आहे. उद्या सकाळी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी ८ ते १० लोकांवर कारवाई केल्याचे म्हटले होते. पण यातील दोन लोकांना त्यांनी सोडून दिल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. क्रूझ पार्टीत भाजप नेत्याचा मेव्हणाही होता. पण त्याला सोडून देण्यात आलं. त्याचे वानखेड यांच्याशी काय कनेक्शन आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
ड्रग्ज प्रकरणी (Mumbai rave party case) आर्यन खान, अरबाज मर्चंटसह काहीजणांना अटक झाली. सध्या हे कोठडीत आहेत. ज्यावेळी ड्रग्ज प्रकरणी कारवाई झाली होती त्यावेळी तिथे के. पी. गोसावी आणि भाजपचे पदाधिकारी मनीष भानुशाली उपस्थित होते, असा गौप्यस्फोट याआधी नवाब मलिक यांनी केला होता. आता त्यांनी याबाबत व्हिडिओसह पुरावे देणार असल्याचा दावा केला आहे.
कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एनसीबी) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक झाली. या कारवाईवर राष्ट्रवादीने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत. ज्यावेळी आर्यन खान याला ज्या व्यक्तीने ताब्यात घेतले, त्या व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण एनसीबीने हा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याच जाहीर केलं होतं. पण राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या व्यक्तीसंबंधी मोठा गौप्यस्पोट केला. आर्यन खान याला ज्या व्यक्तीने ताब्यात घेतले. तो व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नव्हता. त्या व्यक्तीचे फोटो भाजपच्या नेत्यांसाबत आहेत, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूवी केला आहे.