नाशिक : बाळ येशूच्या यात्रेला लोटला जनसागर; आज देखील गर्दी वाढण्याची शक्यता | पुढारी

नाशिक : बाळ येशूच्या यात्रेला लोटला जनसागर; आज देखील गर्दी वाढण्याची शक्यता

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
देश-विदेशातील ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिकरोड येथील बाळ येशूच्या दोन दिवसांच्या यात्रेला शनिवारी (ता. 11) उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी चार लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. ही संख्या रविवारी (ता. 12) यात्रा समारोपापर्यंत पाच लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेवियर्स शाळेच्या आवारातील बाळ येशू मंदिरात ही यात्रा दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात भरते. शाळेच्या मैदानात मिसासाठी मोठा मंडप उभारण्यात आला आहे. तेथे पहिल्या दिवशी सकाळी नाशिक धर्मप्रांताचे महागुरू बिशप ल्युडस डॅनिएल यांच्या प्रमुख उपस्थितीत मिसा (प्रार्थना) झाली. पहाटे 6 ते सायंकाळी 7 या दरम्यान दरतासाला इंग्लिश, मराठी, कोकणी, तमिळ व अन्य भाषांमध्ये मिसा झाली. उद्याही मिसा होणार आहेत. गोवा, तमिळनाडू आदी ठिकाणांहून फादर्स, सिस्टरही दाखल झाले आहेत. यात्रेचे संयोजन फादर एरोल फर्नांडिस, फादर अगस्तीन डिमेलो, फादर टेरी, फादर बॉस्को, फादर टोनी, फादर लोबो आणि त्यांचे सहकारी करत आहेत. बाळ येशू मंदिराच्या आवारात पिलग्रिम आणि रिट्रीट हाउस सभागृहात गरीब भाविकांची निवासाची सोय करण्यात आली. पूजेच्या वस्तू, शीतपेय, शोभीवंत व अन्य वस्तूंची तसेच फळांची दुकाने थाटण्यात आली आहेत. भाविकांना यात्रास्थळी येण्यासाठी सिटीबसची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक भाविक रेल्वेने आले आहेत. नाशिकरोडची हॉटेल्स बुक झालेली आहेत. गेली दोन वर्षे करोना संकटामुळे यात्रा भरली नव्हती. यंदा देश-विदेशातून लाखो भाविक येणार असल्याने मंदिर प्रशासन, वाहतूक आणि उपनगर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.

मैदानात पार्किंगची सोय
नेहरूनगर, जेतवननगर येथील मैदान वाहनांच्या पार्किंगने भरून गेले होते. मंदिरात दर्शनासाठी बॅरिकेडिंग, खासगी सुरक्षारक्षक, सीसीटीव्हीची व्यवस्था आहे. चर्च प्रशासनाकडून चौकशी व माहिती कक्ष स्थापन करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 30 ते 35 अधिकारी व पोलिस वाहतुकीचे नियोजन करीत आहेत. कायदा सुव्यवस्थेसाठी उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर, पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

समाजासाठी योगदान द्या : बिशप डॅनिएल
मिसावेळी बिशप ल्युडस डॅनिएल यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. आपला जन्म हा आपल्या इच्छेनुसार झालेला नाही, तर परमेश्वराने खास नियोजन करून विशेष कार्य करण्यासाठी आपल्याला भूतलावर पाठवले आहे. आपण ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. आतापर्यंत आपण त्याच्या कसोटीला उतरलो का, याचे आत्मपरीक्षण करा. आपली क्षमता ओळखून समाजासाठी योगदान द्या. नकारघंटा वाजवत बसू नका. दुःख, निराशा, बेरोजगारी अशा सर्व संकटांत परमेश्वर सदैव आपल्या सोबत असतो. आपली उत्पत्ती परमेश्वरातूनच झाली आहे. अंतही त्याच्यातच होणार आहे. सर्व संकटांतून तो आपल्याला तारून नेतो. परमेश्वर हा अंधारातील आशेचा किरण आहे. त्यामुळे घाबरू नका, कधीच निराश होऊ नका. जेव्हा आपण परमेश्वराला शरण जातो तेव्हा वेगळाच आनंद मिळतो. आज येथे हजारो भाविक दर्शन तसेच प्रार्थनेसाठी आले आहेत. प्रार्थनेत अनोखी ताकद असते. आपल्या प्रार्थनेने दूरवरच्या गरजूलाही तिचा लाभ होतो, असा संदेश त्यांनी दिला.

हेही वाचा:

Back to top button