

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे पुण्याजवळ उभारलेल्या जगातील सर्वांत मोठ्या रेडिओ दुर्बिणीच्या (जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप, जीएमआरटी) कामात व्यत्यय येण्याची चिंता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
अलीकडेच झालेल्या एका बैठकीत पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला 'तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. १६ हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित पुणे-नाशिक हाय- स्पीड रेल्वे प्रकल्पामुळे विकासाला चालना मिळेल आणि दोन्ही शहरांच्या औद्योगिक क्षेत्रांना अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
एकीकडे या प्रकल्पामुळे महाराष्ट्र खूश असतानाच जगातील सर्वांत मोठी दुर्बीण या प्रकल्पामुळे धोक्यात येऊ घातली आहे. हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी निवडलेला मार्ग नारायणगावमधून जातो जो जीएमआरटीच्या अँटेनाच्या १५ किमी सर्कलमध्ये आहे आणि काही ठिकाणी या सुसाट रेल्वेचे रूळ अँटेनाच्या अगदी जवळून जाणार आहेत. दुर्बिणीच्या एका अँटेनापासून रुळांचे सर्वांत जवळचे अंतर किलोमीटरपेक्षा कमी आहे. जीएमआरटी ऑपरेशन्ससाठी हा संपूर्ण मार्ग अतिशय धोकादायक असेल. कारण हायस्पीड इलेक्ट्रिक ट्रेन पुढे सरकते तेव्हा तिचा पॅन्टोग्राफ हाय पॉवर लाइनला स्पर्श करतो आणि तो मेक-अँड ब्रेक कॉन्टॅक्ट आणि स्पार्क्स तयार होतो. अवांछित किरण- त्सर्ग निर्माण करतात, असे जीएमआरटीच्या माहीतगारांनी सांगितले.
सर्व आधुनिक गाड्यांमध्ये दळ- णवळण प्रणाली असते जी सामान्यतः जीएमआरटी चालवते अशा फ्रिक्वेन्सीच्या असतात आणि यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुर्बीण सुरक्षित ठेवण्यासाठी जीएमआरटीच्या अधिकाऱ्यांनी या संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. रेल्वेकडून आम्हाला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला असला तरी अंतिम निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत प्रकल्पाला पुढे जाण्यास मान्यता देणे आमच्यासाठी चिंताजनक आहे, असे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्सचे (एनसीआरए) संचालक यशवंत गुप्ता म्हणाले.
महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी माध्यमांना सांगितले की, आम्ही जीएमआरटीच्या अधिकारऱ्यांसोबत बैठका घेतल्या असून रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल आणि सर्व अडचणी दूर केल्या जातील, असे ते म्हणाले.