नाशिक : थकबाकी वसुलीसाठी होत आहेत कारखाने सील | पुढारी

नाशिक : थकबाकी वसुलीसाठी होत आहेत कारखाने सील

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
सवलत योजना दिल्यानंतरही बड्या थकबाकीदारांकडून कर भरणा करण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे मालेगाव महानगरपालिकेने धडक कारवाईला प्रारंभ केला आहे. त्याअंतर्गत यंत्रमाग कारखाने सील करण्यासह नळजोडणी खंडित केली जात आहे.

प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी घरपट्टी व पाणीपट्टी तसेच संकीर्ण करवसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी लोकअदालतमध्ये थकबाकीची प्रकरण ठेवण्यात येऊन एकरकमी तडजोडीचे प्रयत्न झालेत. त्याचा काही थकबाकीदारांनी लाभ घेतला. मात्र, वर्षानुवर्षेच्या अनुभवाला सरावलेले मालमत्ताधारक अद्यापही प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, वर्षाच्या प्रारंभीच प्रशासनाने संपूर्ण थकबाकी अदा करणार्‍यांना व्याजात सवलत योजनाही दिली. त्याकडेही अनेकांनी काणाडोळा केल्याने अखेर प्रशासनाने सक्तीच्या वसुलीला प्रारंभ केला आहे. प्रभाग कार्यालयांना कार्यक्षेत्रातील थकबाकीदारांवर कारवाईचे आदेश आहे. त्यासाठी प्रभागनिहाय स्वतंत्र पथके गठीत केले आहेत. पथकांमार्फत थकबाकीदारांना दणका दिला जात आहे. प्रभाग समिती दोन कार्यालयाने सोमवारी द्याने भाग क्रमांक दोन या वसुली वॉर्डात जप्तीची कारवाई केली. मंजू सुबोध शर्मा (गट नं.149/20+21) यांच्याकडे दोन लाख 34 हजार 328 रुपयांची घरपट्टी थकीत आहे. त्यापोटी त्यांचा यंत्रमाग कारखाना सील करण्यात आला. तसेच इस्लामपुरा -4 येथील दोन थकबाकीदारांची नळजोडणी खंडीत करुन 40 हजारांची थकीत रक्कम वसूल केली गेली. सहाय्यक आयुक्त सचिन महाले, जप्ती अधिकारी श्याम बुरकुल, दिनेश मोरे, मोहम्मद इरफान मोहम्मद आश्रफ, अनिल सांगळे, वार्ड लिपिक सचिन ढिलोर, अजित बच्छाव, विनोद बोरकर, देविदास भोये, अनिल पवार, आप्पा आहिरे या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा:

Back to top button