भोसरी : चिमुकल्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार कधी? | पुढारी

भोसरी : चिमुकल्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार कधी?

भोसरी; पुढारी वृत्तसेवा : भोसरी परिसरात शाळकरी मुलांना शिक्षण घेण्यासाठी रस्ता ओलांडताना जिवघेणी कसरत करावी लागत आहे. शिक्षणासाठी करावा लागणारा जिवघेणा प्रवास विद्यार्थी व पालकांसाठी धोक्याची घंटा ठरू पाहत आहे. चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शाळेत ये-जा रोजच करावी लागत असते.

परंतु भोसरी परिसरात अशा अनेक शाळा आहेत, ज्या ठिकाणी रस्ता ओलांडतांना पाल्य व पालकांना धक्कादायक पद्धतीने कसरत करावी लागत आहे. पालिका प्रशासनाच्या तोकडड्या यंत्रणेचा फटका विद्यार्थांना बसत आहे. विद्यार्थी व पालकांची होणारी हेळसांड पालिका प्रशासन थांबविणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

भोसरी परिसरात अनेक सरकारी तसेच खासगी शाळा आहेत. भोसरी व परिसरातील हजारो विद्यार्थी भोसरी परिसरातील शाळेत मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. परंतु, शाळंकरी मुलांना शिक्षण घेण्यासाठी जिवघेणी कसरत करावी लागत आहे. शिक्षणासाठी जीव मुठीत धरून रस्ता ओलांडणारे विद्यार्थी व पालक रस्ता ओलांडतानाचे चित्र भोसरी परिसरात नियमितपणे पाहायला मिळत आहे.

भोसरी परिसरातून पुणे-नाशिक महामार्ग जात असल्याने या रस्त्यावर छोट्या व मोठ्या वाहनांची वर्दळ असते.  महामार्गांवर असलेल्या दुभाजकांमधून विद्यार्थी वाट काढीत रस्ता पार करतात. तसेच वाहतूक पोलिसांचेही लक्ष नसते. प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

गतिरोधकाची मागणी
वाहनधारक वाहतुकीचे कुठलेही नियम पाळतांना दिसत नाहीत. महामार्गांवर सूचना फालकांची तसेच भरधाव वेगाने धावणार्‍या वाहनांच्या वेगाला लगाम घालणारे गतीरोधक बसविण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. त्यात भर की काय, परिसरातील अनेक शाळेचे अवतीभवती प्रशासनाच्या वतीने शाळा असल्याचे फलक, वेगाची मर्यादा ठरविणारे वाहतुकीचे चिन्ह लावण्यात आलेले नसल्याने पालकांना तसेच वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

Back to top button