मिरवणुकीमुळे थेरगाव-वाकड रस्त्यावर वाहतूक कोंडी | पुढारी

मिरवणुकीमुळे थेरगाव-वाकड रस्त्यावर वाहतूक कोंडी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : लग्नापूर्वीच्या मिरवणुकीसाठी ट्रक्टरवर मोठा डीजे लावण्यात आला होता. त्यांच्या तालावर नाचण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. या खासगी मिरवणुकीमुळे थेरगाव-वाकड रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकारामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला.

लग्नापूर्वीचे विधीच्या मिरवणुकीसाठी रविवारी (दि.5) सायंकाळी सातच्या सुमाारास ट्रक्टर ट्रॉलीवर मोठ्या आकाराचा डीजे लावण्यात आला होता. रस्त्याची एक बाजू पूर्णपणे वाहतुकीस बंद करण्यात आली होती. त्यामुळे थेरगाव डांगे चौकातील वाहतूक विरुद्ध मार्गाने वळविण्यात आली. तर, वाकडकडून येणारी वाहने त्याच मार्गावर समोरासमोर येत होती.

रविवारच्या साप्ताहिक सुटीमुळे या परिसरातील मॉल, हॉटेल, दुकानांत प्रचंड गर्दी होते. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची संख्या मोठी होती. एकाच मार्गावर समोरासमोर वाहने आल्याने लांबपर्यंत वाहने अडकून पडली होती. त्यात पीएमपीच्या बसही होत्या. परिसरात रस्त्यांचे काम सुरू असल्याने धुळीचा त्रास होत होता.

वाहतूककोंडी असतानाही डीजेवर कर्कश आवाज आणि रंगीबेरंगी फिरते दिव्यांची रोषणाई कायम होती. त्यावर तरूणांई थिरकत होती. तर, दुभाजक व रस्त्यावर उभे राहून बघ्याची गर्दी वाहतूककोंडी भर घालत होती. अशी स्थितीत पोलिस यंत्रणा कोठे दिसून आली नाही. त्यामुळे कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांनी संताप व्यक्त केला.

Back to top button