नाशिकमधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्या यासाठी बालपरिषद | पुढारी

नाशिकमधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्या यासाठी बालपरिषद

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

युवकांना सुरक्षित व तंबाखूमुक्त वातावरण मिळावे,  तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास अधिक बळकटी यावी आणि नाशिक मधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशन च्या वतीने ऑनलाइन बालपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. 31 जानेवारी सकाळी अकरा ते साडे बारा वाजेदरम्यान ही परिषद होणार आहे.

ह्या ऑनलाइन बालपरिषदेच्या माध्यमातून भारत देशातील ०३ राज्यामधून २५० शालेय विद्यार्थी त्यांना आलेले अनुभव मांडणार आहेत. तसेच मंचावर उपस्थित अधिकाऱ्यांना प्रश्न ही विचारणार आहेत. या ऑनलाइन एव्हरेस्ट बालपरिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या बालपरिषदेमध्ये नाशिक जिल्ह्यातील एकूण २५० विद्यार्थी आणि ५० शिक्षक प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.

सलाम मुंबई फाऊंडेशन, एव्हरेस्ट फाउंडेशन २०१५-१६ पासून शिक्षण व आरोग्य विभागाच्या सहकार्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून, नाशिक (महाराष्ट्र) कैमूर (मध्यप्रदेश) आणि भरूच (गुजरात) मधील युवकांना सुरक्षित व तंबाखूमुक्त वातावरण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. तंबाखू नियंत्रणाच्या क्षेत्रात तरुण चॅम्पियन म्हणून शालेय विद्यार्थ्यांची भूमिका अधिक प्रभावी व्हावी यासाठी एक व्यासपीठ निर्माण केले आहे ते म्हणजे बालपरिषद होय. यावर्षी देखील तृतीय ऑनलाइन एव्हरेस्ट बालपरिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तसेच मुलांचे भविष्य तंबाखूमुक्त व आरोग्यदायी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तंबाखूच्या वाढत्या महामारीपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकार कटीबद्द आहे.

नाशिक जिल्ह्यातील कार्यक्रमाचे यश लक्षात घेता या कार्यक्रमात मुलांचा प्रत्यक्ष सहभाग वाढावा आणि शालेय स्तरावर तंबाखूमुक्त शाळा मोहीम अधिक मजबूत व्हावी याहेतूने यावर्षी पुन्हा एकदा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी तृतीय बालपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  या बालपरिषदेस विजयराघवगड (मध्यप्रदेश), वागरा तालुका (गुजरात) मधील २५ विद्यार्थी आणि शिक्षणाधिकारी देखील उपस्थित रहाणार आहेत. सलाम मुंबई फाऊंडेशन आणि एव्हरेस्ट फाऊंडेशनच्या सहकार्याने 74 शाळांमध्ये मध्यप्रदेश मधील विजयराघवगड केंद्रामध्ये शाळांसोबत तंबाखूमुक्त शाळांचे कार्य सुरु आहे.

…इतकं आहे तंबाखू सेवनाचे प्रमाण

तंबाखू ही इतर सर्व रोगांची जननी आहे. आज सम्पूर्ण भारत देशात २८. ६ टक्के प्रौढ तंबाखूचे सेवन करत आहेत तर आपल्या आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रौढ व्यक्तीचे तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण जवळपास २६. ६ टक्के आहे. मुलांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास ५. १ टक्के युवक (१३ ते १५ वयोगट) हे तंबाखूचे सेवन करत आहेत आणि आपल्यासाठी हि चिंतेची बाब आहे. या समस्येवर राष्ट्रीय स्तरावर भारत सरकार देखील कार्य करत आहे.

…या शााळा झाल्या तंबाखूमुक्त

नाशिक जिल्ह्यात २०१५-१६ पासून सलाम मुंबई फाऊंडेशन, एव्हरेस्ट फाऊंडेशन, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न मुलं हा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील ९५०० शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमांतर्गत एव्हरेस्ट फाऊंडेशनच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, पेठ, कळवण चांदवड आणि सुरगणा तालुक्यातील शाळा तंबाखूमुक्त झालेल्या आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात एकूण ३८२० शाळा तंबाखूमुक्त झालेल्या असून महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत एकूण ३८८९६ शाळा तंबाखूमक्त झालेल्या आहेत. सलाम मुंबई फाउंडेशनच्या तंबाखू नियंत्रणावर सुरु असलेल्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने घेतली असून महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार संस्थेला प्रदान केला आहे.

बालपरिषदेला यांची असणार उपस्थिती

डॉ. अशोक थोरात (शल्य चिकित्सक- नाशिक) यांच्या हस्ते ऑनलाइन बालपरिषदेचे उदघाटन करण्यात येईल. तर, मध्यप्रदेश आरोग्य विभागाचे उपसंचालक उपेंद्र धोटे,  नाशिक एफडीए, विभागाचे सहायक आयुक्त गणेश परळीकर, शिक्षण विभागाचे सहायक संचालक पुष्पावती पाटील, गुजरात आरोग्य विगाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण कुमार सिंग, महाराष्ट्र एनटीसीपी आरोग्य विभाग कार्यक्रम अधिकारी गणेश सोनुले, विजयराघवगड  गटशिक्षणाधिकारी ए. के कोरी, सलाम मुंबई फाऊंडेशनचे विश्वस्त राजेश्री कदम, एव्हरेस्ट फाऊंडेशनच्या सीएसआर हेड मीनाक्षी डे उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करतील.

हेही वाचा : 

Back to top button