Nashik : बारामतीचा पहिलवान भारत मदने ठरला त्र्यंबकेश्वर केसरी | पुढारी

Nashik : बारामतीचा पहिलवान भारत मदने ठरला त्र्यंबकेश्वर केसरी

त्र्यंबकेश्वर : (जि.नाशिक) पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर येथे आयोजित कुस्त्यांच्या विराट दंगलीत बारामतीचा पहिलवान भारत मदने याने प्रथम क्रमांकाची कुस्ती मारत २ लाख रुपये आणि चांदीची गदा जिंकली. तर त्र्यंबकेश्वरचा पहिलवान निशांत शांताराम बागुल याने दुसरा क्रमांक पटकावत 61 हजार रुपये व मानाची चांदीची गदा जिंकली. निशांत बागुल यांची कुस्ती अत्यंत लक्षवेधी ठरली. महाराष्ट्र चॅम्पियन राहिलेल्या अंगज बुलबुले यास अवघ्या दोन मिनिटात निशांत याने आसमान दाखविले. त्याच्या या कुस्ती कौशल्याने अवघे मैदान टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेले.

दरम्यान पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत दिल्लीचा पहिलवान सुखचंद गुलिया याला बारामतीचा पहिलवान भारत मदने याने पराभूत केले. यावर्षी त्र्यंबकेश्वर केसरीचा मानकरी भारत मदने आणि उपकेसरीचा मानकरी निशांत बागुल घोषित करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर येथे दरवर्षी १ मे महाराष्ट्र दिनास होणाऱ्या सुवर्ण जयंती कुस्त्या यावर्षी प्रजासत्ताक दिन गुरवार दि. 26 जानेवारीस घेण्यात आल्या. दुपारी चार वाजेपासून सुरू झालेली कुस्त्यांची दंगल रात्री नऊ वाजे पर्यंत सुरू होती. १०० रुपयापासून २ लाख रुपये पर्यंतच्या बक्षिसाच्या कुस्त्या झाल्या. यावर्षी एकूण २५६ कुस्त्या लढवण्यात आल्या.

या कुस्त्यांसाठी आरपीआय जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे, नगरसेविका अनिता बागुल यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली. पंच म्हणून डॉ.सत्यप्रिय शुक्ल, पिंटूभाऊ काळे, राजाभाऊ घुले, दीपक लोखंडे, कैलास अडसरे, विश्वस्त भूषण अडसरे, गणपत कोकणे, महेंद्र बागडे, संदीप पन्हाळे, नितीन शिंदे, राजेंद्र कदम, गोकुळ कदम, शांताराम बागुल यांनी परिश्रम घेतले. जेष्ठ वस्ताद विनायक बिरारी, शंकर पेहरे यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा : 

Back to top button