दौंड रेल्वेस्थानक बनले चोरट्यांचा अड्डा | पुढारी

दौंड रेल्वेस्थानक बनले चोरट्यांचा अड्डा

दौंड; पुढारी वृत्तसेवा : दौंड रेल्वेस्थानकावर गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे दौंड रेल्वेस्थानक हे चोरट्यांचा अड्डा बनले आहे. याकडे रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांचे दुर्लक्ष आहे. दौंड रेल्वेस्थानकावर मागील सोमवारी (दि. 23) एक आर्मी विंग कमांडर दत्ताराज वासुदेव पाटील (वय 23, मूळ रा. वरवंड, ता. मेहकर, जि. बुलडाणा) हे प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर असलेल्या मोकळ्या जागेत बसले होते. ते त्यांच्याजवळील बॅग डोक्याजवळ ठेवून झोपले. काही वेळाने त्यांना जाग आली असता ती बॅग त्यांच्या डोक्याखाली नसल्याचे निदर्शनास आले. या बॅगेमध्ये त्यांचे नऊ एमएमचे पिस्तूल, सहा राउंड व एटीएम कार्ड तसेच बँकेची व संरक्षण खात्याची कागदपत्रे होती. ही बॅगच चोरीला गेली.

याच रेल्वेस्थानकावर दुसर्‍या एका घटनेमध्ये मैसूर येथील प्रा. रूपा हनुमंतराव नलावडे (वय 40, रा. बागलकोट, कर्नाटक; सध्या नोकरी कर्नाटक कॉलेज) या सिकंदराबाद-राजकोट या गाडीने पहाटे पावणेचार वाजता दौंड रेल्वेस्थानकावर उतरल्या. त्या दिल्ली येथे जाण्याकरिता सकाळी दहा वाजता गाडी असल्याने त्या थांबल्या होत्या. या वेळी त्यांच्याकडे असलेली एक ट्रॉली बॅग अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून पळवली.

या बॅगेत 30 हजार रुपये किमतीचा मोबाईल, एक लाख रुपयांचे लॉकेट, पाच हजार रुपयांची कर्णफुले व रोख रक्कम 20 हजार तसेच म्हैसूर कोर्टाचे महत्त्वाचे नोटिफाईड सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, अशी कागदपत्रे होती. त्यांचा 1 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

चोरीचे हे सत्र दौंड रेल्वेस्थानकावर गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असून, आरपीएफ पोलिसांना चोर का सापडत नाहीत, हे महत्त्वाचे. या रेल्वेस्थानकावर सर्वत्र सीसीटीव्ही आहेत. त्याचा पोलिस का आधार घेत नाहीत, संशयितांना का हटकत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. यावरून रेल्वे पोलिस किती तत्पर आहेत, हे सिद्ध होत आहे.

Back to top button