

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
काॅंग्रेसने देशात उभारलेले प्रकल्प विकून मूठभर लोकांना श्रीमंत करण्यास सत्ताधारी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार वर्गासह नागरिकांची दिशाभूल करीत आपले पुरोगामी विचार, संविधान संपवण्याचा प्रयत्न भाजप करीत आहेत. सर्वांना गुलामीत नेण्याचा प्रयत्न होत असून, त्याविरोधात 'हाथ से हाथ जोडो' हे अभियान सुरू करण्यात आले आहे. देशहितासाठी हे अभियान असून, त्यात राजकारण नसल्याचे प्रतिपादन काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केले.
शहरातील काॅंग्रेस भवनात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी आ. पटोले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी राज्यमंत्री शोभा बच्छाव, माजी आ. राजाराम पानगव्हाणे, ब्रीजकिशोर दत्त, माजी नगरसेवक शाहू खैरे, राहुल दिवे, हेमलता पाटील, लक्ष्मण जायभावे, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष हनीफ बशीर, संतोष लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पिंपळगाव बसवंत येथील संतोष अहिरराव यांनी आ. पटोले यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. आ. पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे तरुणवर्ग काॅंग्रेसकडे आकर्षित होत आहे. भाजपने गांधी कुटुंबीयांसह काॅंग्रेसची प्रतिमा डागाळण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले. त्याचप्रमाणे जनतेला खोटे स्वप्न दाखवून त्यांची दिशाभूल केली. काॅंग्रेसने जे उभे केले ते विकून मूठभर लोकांना श्रीमंत केले जात आहे. मोदी सरकारने देशातील २१ उद्योगपतींचे साडेदहा लाख कोटींचे कर्ज माफ केले असून, रिझर्व्ह बॅकेने ती यादी प्रसिध्द करू नये अशी ताकीद दिल्याचे आ. पटोले यांनी सांगितले.
सत्ताधारी सरकारने देशाचे संविधान संपुष्टात आणायचे ठरवले. भाजप व आरआरएसचे हे षडयंत्र आहे. पुरोगामी विचार संपला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहे. भाजपने नवीन संविधान लिहायला सुरुवात केली आहे. त्यांना शेतकरी, कामगार, बहुजनांना गुलामीत टाकायचा असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशातील परिस्थिती गंभीर असून, काॅंग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडे यात्रेतून संविधान वाचविण्याची लढाई लढत आहे. आज देशाच्या सीमा सुरक्षित नाही. राज्यात महापुरुषांचा सातत्याने अपमान केला जात आहे. ही लढाई संविधान वाचविण्याची आहे. सर्वांनी त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आ. पटोले यांनी केले.
हेही वाचा :