शिवसेना-वंचित आघाडी युतीचा काहीही फरक पडणार नाही : रामदास आठवले | पुढारी

शिवसेना-वंचित आघाडी युतीचा काहीही फरक पडणार नाही : रामदास आठवले

वाई; पुढारी वृत्तसेवा : कोणी कोणाबरोबर युती करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ते दोघे एकत्र आले म्हणजे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आले असे म्हणता येणार नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्याच्या आणि मुंबईच्या राजकारणावर काहीही फरक पडणार नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी केली.

महाबळेश्वर येथे शिबिराला जाण्यापूर्वी ना. रामदास आठवले यांनी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ना. आठवले म्हणाले, आंबेडकरी अनुयायांमध्ये भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे कोणतीही अस्वस्थता नाही. आमच्या पक्षावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. आमचा पक्ष ज्या बाजूला असेल त्या बाजूला सत्ता असते. हे अनेक वर्षाचे गणित आहे. यावेळी मुंबई महापालिकेमध्ये भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची सत्ता येईल. राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात रिपाइंला संधी मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून अशोकराव गायकवाड यांच्या नावाचा विचार होत आहे. जिल्ह्यात रिपाइंची ताकद वाढवण्यासाठी गायकवाड यांना ताकत देणार आहे. रिपाइं फक्त दलितांसाठी काम करणार नसून समाजातील सर्व उपेक्षित घटकांसाठी काम करणार आहे. दरम्यान, यावेळी रिपाइंच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन ना. आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, राजाभाऊ सरोदे, युवा नेते स्वप्नील गायकवाड, जीत आठवले, डॉ.तात्यासाहेब जगताप, समाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे, तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे, संतोषराव गायकवाड, बाजीगर इनामदार, सरपंच सौ. हेमलता गायकवाड उपस्थित होते.

Back to top button