मुंबईच्या झवेरी बाजारात ईडी अधिकारी असल्याचे भासवून दोन कोटींच्या ऐवजाची लूट | पुढारी

मुंबईच्या झवेरी बाजारात ईडी अधिकारी असल्याचे भासवून दोन कोटींच्या ऐवजाची लूट

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; अभिनेता अक्षय कुमार याच्या स्पेशल २६ चित्रपटाप्रमाणेच सहा जणांच्या टोळीने सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी असल्याचे भासवत झवेरी बाजारमध्ये ०३ किलो सोने आणि २५ लाखांची रोख रक्कम अशा सुमारे दोन कोटींच्या ऐवजाची लूट करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी घडली. यामुळे झवेरी बाजारात दहशतीचे वातावरण परसले असून, लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी एका महिलेसह एकूण तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

झवेरी बाजारातील खाऊ गल्लीमध्ये एस. एन. के. प्लाझा इमारतीमध्ये एका व्यावसायिकाचा व्ही. बी. एल बुलियन नावाने सोने-दागिने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास या कार्यालयात दोनजण ईडीचे अधिकारी म्हणून घुसले. त्यांनी व्यावसायिक विराटभाई कुठे आहेत. त्यांची चौकशी करायची आहे, असे बोलून यातील एकाने कामगार माली याच्या कानशिलात मारले. अचानक घडलेल्या या घटनेने कामगार चांगलेच घाबरले. त्यानंतर या दोघांनीही सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणे येथील कामगारांचे मोबाईल काढून घेत कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली. यावेळी कामगारांना येथे असलेली रोख रक्कम, सोने आणि अन्य किंमती वस्तू एका बॅगेत भरण्यास सांगितले.

घाबरलेल्या कामगारांना मारहाण करुन त्यांनी १ कोटी ७० लाख रुपये किंमतीचे ०३ किलो सोने आणि २५ लाख रुपये असलेल्या तीन बॅगा ताब्यात घेतल्या. त्यानंतर या दोघांनीही दोन कामगारांना बेड्या घालून आपल्यासोबत चलण्यास सांगितले. दोन्ही कामगारांना घेऊन त्यांनी विराट यांचे धनजी स्ट्रीटवरील डायमंड हाऊसमध्ये असलेले जूने कार्यालय गाठले. तेथे एका महिलेसह अन्य एक जण होता. त्यांनी या कार्यालयातील व्यवस्थापक विजयभाई शहा यांची चौकशी करत तेथून काढता पाय घेतला.

ईडीच्या धाडीच्या नावाखाली करण्यात आलेल्या लुटीचा हा थरार अर्धा तास सुरु होता. भरदिवसा घडलेल्या या लुटीच्या घटनेने कामगार चांगलेच घाबरले होते. अखेर त्यांनी अन्य व्यावसायिकांना याची माहिती दिल्यानंतर घटनेची माहिती लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याला देण्यात आली.

झवेरी बाजारातील या लुटीच्या घटनेची गांभार्याने दखल घेत या प्रकरणी गुन्हा दाखल करुन परिमंडळ दोनचे उपायुक्त अभिनव देशमुख, पायधुनी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त जोत्स्ना रासम यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या व पोनि ज्योती देसाई यांच्या नेतृत्वाखाली सपोनि राहुल भंडारे, सपोनि सुशिलकुमार वंजारी, सपोनि बनकर, सपोनि डिगे, सपोनि दराडे, पोउनि रुपेश पाटील, पोउनि मोकल, पोउनि प्रदिप भिताडे, पोउनि शिवाजी पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून गुन्ह्याचा तपास सुरु केला.

गुन्ह्यातील काही आरोपी हे एका कारमधून आले. तर, काही लोक पायी आले. तसेच गुन्हा घडल्यानंतर हे आरोपी कारमधून पसार झाल्याचे पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्हीतून समोर आले. अखेर पोलिसांनी या कारच्या क्रमांकाच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यास सुरुवात करत डोंगरीतील रहिवासी मोहम्मद फजल सिद्दीक गिलीटवाला (वय ५०) याचा गुन्ह्यातील सहभाग समोर येताच त्याला डोंगरीतून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पोलिसांनी मालाडमधील रहिवासी मोहम्मद रजी, अहमद मोहम्मद रफीक उर्फ समीर (वय ३७) याला ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांच्याजवळून गुन्ह्यातील अडिच किलो सोने आणि १५ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस उपायुक्त अभिनव देशमुख यांनी सांगितले.

टोळीतील महिला साथिदार ही रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील रहिवासी आहे. ती गावी पसार झाल्याचे समजताच पोलिसांनी खेड येथे जात तिला ताब्यात घेतले. मुधोळे हिला मुंबईत आणण्यात येत असून, तिला काल (बुधवार) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तसेच, अन्य दोन आरोपींच्या शोधासाठी पथके पुण्याला पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा ; 

Back to top button