नगर पोलिसांची थेट मध्यप्रदेशात धाडसी धाड | पुढारी

नगर पोलिसांची थेट मध्यप्रदेशात धाडसी धाड

नगर : गावठी कट्टे बनविणार्‍या टोळीचा मागमूस काढत नगर पोलिस थेट मध्यप्रदेशात पोहचले. तेथे कट्टे तयार करणार्‍या कारखान्यावर धाड टाकत एकाला अटक केली आहे. नगरच्या तोफखाना पोलिसांनी प्रथमच ही धाडसी कारवाई केली. नगरच्या गुन्हे शाखेने तीन दिवसांपूर्वी तारकपूर बसस्थानकातून गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या एकाला पकडले होते.

यासंदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पकडलेल्या आरोपीच्या माहितीनुसार तोफखाना पोलिसांनी मध्यप्रदेशात धाडसी धाड टाकली. या धाडीत अर्धवट तयार केलेला गावठी कट्टा व कट्टे तयार करण्याचे साहित्य जप्त करत एकाला अटक केली.  जमालसिंग अजितसिंग चावला (रा.खुरमाबाद, ता.सेंदवा जि.बडवानी, मध्यप्रदेश) असे तोफखाना पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तारकपूर बसस्थानकावर गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणलेल्या मुकेश रेवसिंग खोटे उर्फ बरेला (रा. खुरमाबाद, ता. सेंदवा, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) या आरोपीला एलसीबीच्या पथकाने अटक केली होती.

कोठडीत असताना मुकेश रेवसिंग खोटे याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने कट्टे तयार होत असलेल्या कारखान्याची माहिती दिली. त्याआधारे खोटे याला सोबत घेऊन तोफखाना पोलिसांनी सोमवारी (दि.23) मध्यप्रदेशातील खुरमाबाद (ता.सेंदवा, जि. बडवानी) येथे छापा टाकला. गावाशेजारीच एका शेडमध्ये जमालसिंग अजितसिंग चावला हा गावठी कट्टा बनवित असतानाच पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.

यापूर्वीही नगर पोलिसांकडून मध्यप्रदेशात कट्ट्यांचा तपास करण्यात आला होता. मात्र, पहिल्यांदाच तोफखाना पोलिसांना कारवाईत यश आले आहे. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके, हवालदार डी. बी. जपे, संदिप धामणे, संदिष गिर्‍हे, सतिष त्रिभुवन, सुनिल शिरसाठ, सुरज वाबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

नगरमधील डिलर रडारवर
नगर जिल्ह्यात जप्त केलेल्या गावठी कट्ट्यांचे कनेक्शन आतापर्यंत मध्यप्रदेशच असल्याचे समोर आले आहे. तोफखाना पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी योग्य तपास करून मध्यप्रदेशातून आरोपीला अटक केली. आता नगरमधील कट्ट्यांची खरेदी करणारा तो आरोपी पोलिसांच्या रडारवर आहे.

कट्टा बनविण्याचे साहित्य जप्त
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एक अर्धवट बनवलेला गावठी कट्टा, इलेक्ट्रिक ग्राईंडर मशिन, तीन अर्धवट बनवलेले काडतूस, लोखंडी पक्कड, ब्लेड, कानस, स्प्रिंग, हँड ग्राईंडर असा 7 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

 

 

Back to top button