नाशिक :
स्वातंत्र्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली. मात्र, या विकासासाठी जंगल, डोंगरांच्या क्षेत्रांवर घाव घालण्यात आला आहे. वनांच्या टक्केवारीचे कमी होणारे आकडे चिंता वाढविणारे आहेत. जंगलांचा ऱ्हास होत गेल्याने जिल्ह्याच्या चोहोबाजूला तसेच शहरातदेखील मानव-बिबट्या संघर्ष उफाळून आलेला दिसतो. वन्यप्राण्यांचा जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष हा त्यांना लोकवस्तीकडे शिरकाव करण्यास भाग पाडत आहे. बिबट्याचे मानवावरील हल्ले इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यांत कमालीचे वाढलेले दिसून येतात. याला वेगाने होणारा जंगलांचा ऱ्हास कारणीभूत असल्याचे निरीक्षण वन, वन्यजीव अभ्यासकांनी नोंदविले आहे.
नाशिक जिल्ह्यातील बहुतांश सर्वच भागांत कित्येक वर्षांपासून बिबट्याचा अधिवास असून, गेल्या 10 ते 15 वर्षांत बिबट्याचा वावर ग्रामीण भागासह शहरात वाढला आहे. अगदी इमारती, बंगल्यांनी गजबजलेल्या परिसरातही बिबट्या नागरिकांना दर्शन देत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. शहरालगतच्या ग्रामीण भागात उसाच्या शेतीचे प्रमाण अधिक असून, बिबट्याच्या अधिवासासाठी हे ठिकाणे अतिशय सुरक्षित झाली आहेत. शेतमळ्याजवळील घरालगत हे सावज उपलब्ध होते. बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेताना उपलब्ध होणाऱ्या 'फास्ट फूड'मुळे उसातच बिबट्यांच्या पिढ्या राहू लागल्याने मानवाला त्यांच्या सहजीवनासह जागरूकतेची गरज निर्माण झाली आहे.
वन्यजीव संवर्धन कायद्यांतर्गत अधिसूची 1 मध्ये बिबट्याचा समावेश होत असल्याने त्याचे संरक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. शेतीलगत असलेल्या घरांजवळच असलेले पाळीव व भटके प्राणी, मुबलक पाणी, सुरक्षित जागा आणि झाडांचे जंगल घटल्यावर विस्तारलेल्या ऊसशेतीचा आधार घेत बिबट्याची जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे बिबट्यांचा वावर असलेल्या भागात गोठ्यांना जाळ्या बसविणे, गावकऱ्यांना सायंकाळनंतर शेतात पाणी द्यायला जावे लागू नये, यासाठी त्या भागात दिवसा लोडशेडिंग न करणे हे उपाय शक्य आहेत. भटकी जनावरे वाढणार नाहीत, यासाठीही प्रयत्नांची आवश्यकता आहे. गावांमध्ये ठिकठिकाणी लावलेले जागृती फलक, पथनाट्य, शाळा स्तरावर झालेली व्याख्याने, ग्रामसभांमध्ये बिबट्याविषयीचे गैरसमज दूर करणे काळाची गरज झाली आहे.
अशा कराव्या उपाययोजना
– शेतकऱ्यांनी शेतीच्या बांधापासून काही अंतरावर घर बांधावे.
-पाळीव प्राणी बंदिस्त गोठ्यात ठेवावेत. तसेच गोठ्याच्या परिसरात पुरेसा प्रकाश असेल, अशी व्यवस्था करावी.
-सायंकाळी अंधार होण्याची वाट न बघता, घरी तसेच पहाट उजाडताच मळ्याकडे जाणे टाळावे.
-सूर्योदय झाल्यानंतर मळ्याच्या दिशेने हातात काठी वगैरे घेऊन निघावे.
-बिबट्या समोर आल्यानंतर घाबरून न जाता सावकाश त्याच्या नजरेआड होण्याचा प्रयत्न करावा.
-शहरी भागात परिसर स्वच्छ ठेवून बिबट्या भक्ष्याच्या शिकारीसाठी मानवी वस्तीत येणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी.
-वनविभागाकडून बिबट्याप्रवण क्षेत्रातील गावांमध्ये नियमित जनजागृती करावी.