नाशिक : शेतात वन्यप्राण्यांचा धुडगूस, पिकांचे सरंक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी लढवली ‘ही’ शक्कल | पुढारी

नाशिक : शेतात वन्यप्राण्यांचा धुडगूस, पिकांचे सरंक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी लढवली 'ही' शक्कल

नाशिक (कवडदरा) : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, घोटी खुर्द, साकूर शिवारातील पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी काही शेतकऱ्यांनी पिकांना साड्यांचे कुंपण केले आहे. तालुक्यातील काही शिवारात वन जीव प्राणी दिसून येत आहेत.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडी असून, वन्य प्राणी आहेत. यामध्ये सर्वात जास्त रानडुकरे, नीलगायी, हरिण, बिबट्या या प्राण्यांचा वावर आहे. रोही व रानडुकरे पिकांचे नुकसान करीत आहेत. रानडुक्करे, हरिण, मोर, एक काळवीट आढळून आले आहे. कळपाने राहणारे रोही व रानडुकरे पिकांची नासाडी करीत आहेत.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप पिके गेली. आता शेतकऱ्यांची हरभरा, गहू, मका आदी पिकांवर आहे. असे असतानाच आता वन्य प्राणी रात्री कळपाने शेत पिकांचे मोठे नुकसान करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पिकांना तारेचे कुंपण करणे अनेकांना शक्य नाही. त्यामुळे आता काही शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी साड्यांचा पर्याय शोधला आहे. या कापड दुकानात वीस ते पंचवीस रुपयांना एक या प्रमाणे जुनी साडी विकत मिळत आहे. शिवाय वाऱ्यामुळे साड्यांचा आवाज होत असल्याने रानडुकरे शेतात प्रवेश करीत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यातून शेती पिकांचे संरक्षण होत आहे. पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी साड्यांचे कुंपण ही लढविलेली शक्कल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. वन्य प्राण्यांपासून शेती पिकांचे नुकसान टाळण्यासाठी साड्यांचे कुंपण केले आहे. एका एकरसाठी 50 ते 60 साड्या लागतात. त्यानंतर काठी व इतर साहित्य लक्षात घेता दीड हजारांचा खर्च येतो. या दीड हजारांच्या खर्चात लाखमोलाच्या पिकांचे संरक्षण होते.

हेही वाचा :

Back to top button