नगर : अंभोरेतून भरकटलेला बालक सापडला ! | पुढारी

नगर : अंभोरेतून भरकटलेला बालक सापडला !

संगमनेर/ संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील अंभोरे व कोळवाडे शिवारात निळवंडे कालव्याच्या कामावरील कामगाराचा सुनील हा 5 वर्षीय चिमुकला अंभोरे गावात फिरत असताना झोपडीकडे न जाता चुकून एका दुचाकीवर बसून पिंपरणे- जोर्वे मार्गे थेट निंभाळे गावात पोहचला. निंबाळे व अंभोरेतील काही तरुणांच्या मदतीने व संगमनेर शहर पोलिसांच्या सतर्कतेने पालकांच्या ताब्यात सुखरूप पोहचविला. चिमुरड्या सुनीलला पाहून आई- वडिलास हायसे वाटले. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील काही कामगारांची कुटुंबं निळवंडे कालव्यांच्या कामास अंभोरे- कोळवाडे शिवारात काही दिवसांसाठी आले आहेत.

या कुटुंबातील 5 वर्षांचा सुनील हा चिमुकला सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अंभोरे गावात फिरत गेला, मात्र पुन्हा तो झोप डीकडे न येता रस्ता चुकून एका अज्ञात व्यक्तींच्या दुचाकीवर बसून पिंपरणे- जोर्वेमार्गे थेट निंभाळे गावात पोहचला. चुकलेल्या या मुलास आई, वडील शोधून हैराण झाले, मात्र तो न सापडल्यामुळे ते हतबल होत रडू लागले. दरम्यान, घाबरलेल्या अवस्थेत लहान मुलगा निंबाळेमध्ये आल्याची माहिती काही युवकांनी संगमनेर शहर पो. ना. अनिल गवळी व लोमा भांगरे यांना दिली. पोलिसांनी या मुलास पोलिस ठाण्यात आणण्यास सांगितले. तरुण त्याला पोलिस ठाण्यात घेवून आले.

यावेळी चिमुरडा घाबरुन रडत होता. भुकेने व्याकूळ झाला होता. पो. ना. अनिल गवळी यांनी त्याला जेवन दिले, मात्र आई- वडिलाच्या कुशीतुन हरविलेल्या लहान मुलाचे रडणं काही केल्या थांबत नव्हते. पोलिसांनी नाव, गाव, पत्ता विचारला असता त्याला काही सांगता येत नव्हते. यामुळे मोठा पेच पोलिसांसमोर पडला. पो. ना. गवळी यांनी अकोलेचे पो.काँ. सुनील गवारी यांना फोनवरून ही माहिती दिली. त्यांनी पत्रकार नवनाथ वावरे यांना फोनवरून ही माहिती दिली. वावरे यांनी अंभोरेत सुरजीत खेमनर व कोंडाजी कडनर यांना मुलाचा फोटो सोशल मीडिया वरून व्हायरल करण्यास सांगितले.

दरम्यान, अंभोरेतील युवकांनी शोध मोहीम सुरू केली. एक दाम्पत्य सैरावैरा होवून हरवलेल्या मुलाचा शोध घेत होते. खेमनर यांनी या दाम्पत्यास मुलाचा फोटो दाखवित संगमनेर शहर पोलिस ठाण्यात नेवून चिमुकल्यास वडिलांच्या हवाली केले.

खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन..!

संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथून हरवलेला सुनील हा चिमुकला अंभोरेतील लक्ष्मण वावरे, सुरजीत खेमनर, कोंडाजी कडनर यांच्यासह निंबाळेच्या तरुणांचे प्रयत्न तर संगमनेर शहरचे पो. ना. अनिल गवळी, सुनील गवारी व लुमा भांगरे यांनी खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवत चिमुकल्याला वडिलांच्या हवाली केले.

Back to top button