मुलाला फोन करून सांगितले आणि पित्याने आत्महत्या केली | पुढारी

मुलाला फोन करून सांगितले आणि पित्याने आत्महत्या केली

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा : आपल्या मुलास फोनवरून माहिती देत पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खु” येथील ५७ वर्षीय पित्‍याची गळफास घेऊन आमहत्या झाल्‍याची घटना घडली.

ही घटना आज (रविवार) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेबाबत पाचोरा पोलिस स्‍टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पित्‍याची गळफास घेऊन आमहत्या झाल्‍याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक व पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे करत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खु” येथील रहिवाशी ईश्वर भिकन गोसावी (वय ५७) हे शेतमजुरी करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. शनिवारी पत्नी व दोन मुले तारखेडा येथे मामाच्या घरी गेले होते.

फाेनवरून दिली आत्‍महत्‍येची माहिती

ईश्वर गोसावी हे घरी एकटेच होते. आज (रविवार) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा गणेश गोसावी यांच्याशी त्यांनी मोबाईल द्वारे संपर्क केला व सांगितले की, मी आत्महत्या करत आहे.

पित्याचे हे वाक्य ऐकुन गणेश याने त्यांना विनंती केली की, असे करु नका, तुम्हाला काय त्रास आहे ते सांगा. परंतु ईश्वर गोसावी यांनी मोबाईल बंद केला.

पत्नी व दोन्ही मुलांची तत्काळ अंतुर्लीत धाव

त्यानंतर पत्नी व दोन्ही मुलांनी गावात संपर्क केला. त्‍यांनी तात्काळ अंतुर्लीत धाव घेतली. यावेळी त्यांना घराच्या छताला ईश्वर गोसावी यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

यावेळी पत्नी व दोन्ही मुलांनी एकच आक्रोश केला. ईश्वर गोसावी यांना तातडीने पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले.

ईश्वर गोसावी यांनी आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. त्‍यांचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले.

या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्‍टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक व पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे करत आहेत.

ईश्वर गोसावी यांचे पश्चात्य पत्नी, दोन मुले, दोन मुली (विवाहीत) असा परिवार आहे.

Back to top button