नाशिक : ‘कालिदास’चे भाडे कमी करा अन्यथा…, उद्योगमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना सुनावले खडेबोल | पुढारी

नाशिक : 'कालिदास'चे भाडे कमी करा अन्यथा..., उद्योगमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना सुनावले खडेबोल

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

नाटकामधील काही समजत नसेल तर हस्तक्षेप करू नये’, अशा शब्दात मनपा आयुक्तांशी दुरध्वनीवर संवाद साधत महाकवी कालिदास कलामंदीरचे अवाजवी भाडे कमी करा तसेच अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा मी पण राज्याचा उद्योगमंत्री आहे, असे खडेबोल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनपा आयुक्तांना सुनावले.

महाकवी कालिदास कलामंदीर येथे अभिनेता प्रशांत दामले यांच्या सत्कार सोहळ्यासाठी आलेले उद्योगमंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुबंई शाखेचे विश्वस्त उदय सामंत यांच्यासमोर नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कालिदास कलामंदीराच्या भाडेदरांबाबत गाऱ्हाणे मांडले. एका नाटकाला २५ ते ३० हजार भाडे आकारले जात असेल तर नाटकांचे प्रयोग कसे होणार. त्याचबरोबर प्रेक्षकांना ३०० ते ५०० रुपये तिकिट दर आकारले जातात, त्या तुलनेत त्यांना सुविधा मिळत नसतील तर नाटकाला प्रेक्षक मिळणार काय? आदी प्रश्न नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले असता, उद्योगमंत्री सामंत यांनी थेट मनपा आयुक्तांना फोन लावत कालिदासच्या भाडे दराबाबत विचारणा केली. आयुक्तांनी आम्ही अधिकारी आहोत, आम्हाला मर्यादा आहेत, अशाप्रकारे उद्योगमंत्र्यांना सांगितले असता, मी या राज्याचा मंत्री आहे असे सांगत भाडे कमी करावेच लागेल असे एकप्रकारे आदेशच दिले.

त्याचबरोबर अभिनेता प्रशांत दामले यांचा सत्कार करताना देखील सामंत यांनी भाडे दराचा पुर्नउल्लेख करीत आयुक्तांनी अभिवचन न पाळल्यास मी पण राज्याचा उद्योगमंत्री आहे, अशाप्रकारचा इशारा दिला. दरम्यान, नाट्यपरिषदेतर्फे मंत्री सामंत यांच्या हस्ते अभिनेता प्रशांत दामले यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अभिनेत्री वर्षा उसगावकर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, विजय शिंगणे, डॉ. स्वप्निल तोरणे, विनोद राठोड, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आदिती मोराणकर यांनी केले.

आज बैठक

महाकवी कालिदास कलामंदीराचे भाडे कमी करावे याविषयी मनपा आयुक्त अन् अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी सकाळी ११ वाजता मनपा येथे बैठक आयोजित केली आहे. बैठकीत कालिदासचे भाडे कमी करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

भूमिपूत्रांचे कार्यक्रम मोफत व्हावे

वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर नाशिकचे भूमिपूत्र आहेत. त्यांच्या जयंती तथा पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी देखील मनपाकडून २५ हजार रुपये भाडे आकारले जात असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांना सांगितले असता, भूमिपूत्रांचे कार्यक्रम तरी मोफत व्हावेत अशा शब्दात सामंत यांनी आयुक्तांना आदेश दिले. त्याचबरोबर तिकिट दर कमी करण्याबाबतही विचार व्हावे असेही सांगितले.

प्रशांत दामले यांची खंत

अभिनेता प्रशांत दामले यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, ‘उद्योगमंत्री यांनी आपल्याला चांगली भेट दिली आहे. भेटीचा वृत्तांत उद्या कळेलच. तसेच त्यांनी पुन्हा एकदा कालिदासमधील सुविधांबाबत खंत व्यक्त केली. स्वच्छागृहाची स्वच्छता, एसी या सुविधा नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. त्याचबरोबर पत्नी, ड्रायव्हर, प्रेक्षक यासर्वांच्या सहकार्यामुळेच १२ हजार ५०० प्रयोगांचा टप्पा पार करता आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button