world soil day : मृदा संवर्धन काळाची गरज; जगापुढे वाळवंटीकरणाचे आव्हान | पुढारी

world soil day : मृदा संवर्धन काळाची गरज; जगापुढे वाळवंटीकरणाचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंद्रायणी मोहिते : भारतातील शेतीचा सर्वाधिक भाग मोसमी पावसावर अवलंबून आहे. हवामानातील बदलांमुळे शेतीचे नुकसान होत आहे. देशातील शेती उत्पादनामध्ये चढउतार होण्याचे मुख्य कारण अतिशय कमी पाऊस किंवा जास्त पाऊस हे आहे. अत्‍यंत कमी पाऊस, वनस्‍पतींसह प्राणी जीवनही विरळ अशा अतिकोरड्या भागास वाळवंट म्‍हणून ओळखले जाते. यामध्‍ये अतिथंड प्रदेशाचाही समावेश होतो. वाळवंटीकरण आणि दुष्काळ या एकमेकांशी संलग्न गोष्टी आहेत. आज जागतिक मृदा दिनानिमित्त महाराष्‍ट्रासह देशातील वाढत्‍या वाळवंटीकरणावर टाकलेला दृष्‍टीक्षेप…

वाळवंट म्हणजे पृथ्वीवरील अति कोरडा आणि अतिशय कमी पाऊस असलेला प्रदेश. (world soil day) पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी सुमारे १८ टक्के भाग उष्ण वाळवंटी प्रदेशांनी तर १६ टक्के भाग थंड वाळवंटाने व्यापला आहे. दरवर्षी या टक्‍केवारीत वाढ होत आहे. त्‍यामुळे वाळवंटीकरण ही जगासमोरील प्रमुख समस्‍या बनली आहे. जमिनीची होणारी धूप, अमर्याद वृक्षतोड, नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार आणि अमर्याद वापर, एकाच जमिनीत सतत एकच पीक घेणे, यामुळे नापीक होणारी जमीन, अवकाळी पाऊस, वेगाने वाढणारे उद्योग, या सर्व बाबींचा एकूणच पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती उद्‍भवत आहे.

सध्या जगभरातील सुमारे १६९ देशांमध्ये वाळवंटीय स्थिती निर्माण झाली आहे. वाळवंटीकरणामुळे हजारो हेक्टरवरील जमीन नापीक होत चालली आहे. त्यामुळे दुष्काळजन्य स्थिती उद्‍भवत आहे. वाढती लोकसंख्या आणि विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार आणि अमर्याद वापर होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज जगभरातील सुमारे २ अब्ज हेक्टरपेक्षा जास्त जमीन नापीक झाली आहे.

IPCC च्या एका रिपोर्टनुसार, 1948 ते 2012 दरम्यान ज्या भागात तापमानापेक्षा कोरडेपणा जास्त असतो त्या भागात कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज नियंत्रित करते. त्यामध्ये 6% वाढ झाली आहे. आणि त्याच अशाच रीतीने विस्तार चालू राहिल्यास 2050 पर्यंत आणखी ही टक्केवारी 14% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या क्षेत्रांमध्ये, निव्वळ कार्बन इतर क्षेत्रांच्या तुलनेत सुमारे 27% कमी आहे. वाळवंटीकरण पृष्ठभागावर उपलब्ध उर्जा आणि संबंधित पृष्ठभागाचे तापमान कमी करते, ज्यामुळे हवामान बदलावर नकारात्मक प्रतिक्रिया निर्माण होते. वनस्पती आणि मातीवर त्याचा परिणाम होतो. वाळवंटीकरणामुळे हरितगृह वायूंचे (GHG) शोषूण घेण्याच्या आणि सोडण्याच्या प्रक्रीयेत बदल होतो. वाळवंटीकरणामुळे वनस्पती नष्ट होते. आणि पृष्ठभागावरील आच्छादन कोरडे झाल्याने धुळीचे वादळ येण्याची शक्यता वाढते.

world soil day

महाराष्‍ट्रातील ४४ टक्के क्षेत्रावर वाळवंटीकरणाची प्रक्रिया सुरु

रखरखीत, अर्ध-शुष्क आणि कोरड्या उप-आर्द्र भागात जमिनीचा ऱ्हास होतो, ज्यांना एकत्रितपणे कोरडवाहू म्हणून ओळखले जाते. मानवी हस्तक्षेप आणि हवामानातील भिन्नता यांसारख्या अनेक कारणांमुळे निर्माण होते. गेल्या अनेक दशकांमध्ये काही कोरडवाहू भागात वाळवंटीकरणाची तीव्रता वाढली आहे. 2018-19 च्या आकडेवारीनुसार 97.84 दशलक्ष हेक्टर ओसाड जमिनीपैकी, अंदाजे 45 दशलक्ष हेक्टर जमीन राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये निकृष्ट आढळून आली.

महाराष्‍ट्रातील तब्‍बल ४४.९३ टक्‍के क्षेत्रावर वाळवंटीकरणाची प्रक्रिया सुरु आहे, अशी धक्‍कादायक माहिती इंडियन स्‍पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्‍त्रो) आणि अहमदाबाद येथील स्‍पेस ॲप्‍लिकेशन सेंटरने २०१६ मध्‍ये केलेल्‍या अभ्‍यासातून समोर आली होती. या संस्‍थांनी केलेल्‍या अभ्‍यासावेळी २००३ ते २००५ आणि २०११ ते २०१३ या कालावधीतील महाराष्‍ट्रातील भूभागाचा आढावा घेतला होता. महाराष्‍ट्रातील तब्‍बल १, ३८,२५,९३५ हेक्‍टर एवढ्या मोठ्या भूभागाचं वाळवंटीकरण होत आहे. मागील १५ वर्षांमध्‍ये यामध्‍ये १.५५ टक्‍क्‍यांनी भर पडली असल्‍याचे या अभ्‍यासात स्‍पष्‍ट झाले होते.

world soil day

राज्‍यातील ४८ लाख, ८४ हजार हेक्‍टर जमिनीवरील वनराई नष्‍ट होत आहे. पावसाचे पाणी व शेतीसाठी बेसुमार पाणी वापरामुळे ८० लाख ६० हजार ७५३ हेक्‍टर जमिनीची धूप होत आहे. यामुळे महाराष्‍ट्रात वाळवंटीकरणाच्‍या प्रक्रिया भूभागावर सुरु आहेत. राज्‍यात क्षारपड जमीन २९,०८९ हेक्‍टर, पडजमिनी ५०,६१६३ हेक्‍टर अणि रहिवासीकरण झालेली जमीन ३२,६०१३ हेक्‍टर इतकी असून एवढ्या भूभागावर वाळवंटीकरणाची प्रक्रिया होत असल्‍याचे निरीक्षणही या अभ्‍यासात नोंदवले गेले होते.

महाराष्‍ट्राचा विचार करता वाळवंटीकरण रोखण्‍यासाठी प्रामुख्‍याने जमिनीची भूजल पातळी कशी वाढवता येईल, याचा गांर्भीयाने विचार करण्‍याची गरज आहे. पावसाचे पाणी जमिनी मुरवणे तसेच भूजल पातळी शाश्‍वत राहिल यासाठी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हरित पट्टा कमी होत आहे. बेसुमार वृक्षतोड आणि वृक्षारोपणाचा अभाव यामुळे ही समस्या गंभीर होत आहे. तसेच शहरांत वाढणारी वस्ती आणि औद्योगिक पट्ट्यांमधील बांधकाम हे पर्यावरणाला पोषक नाही. यांमुळे भूजल पातळी खालावली आहे. नद्या, तलाव, सरोवरे प्रदूषित झाले आहेत. बेसुमार पाणी वापर आणि सांडपाण्याचा न होणारा निचरा. यामुळे वाळवंटीकरण वेगाने वाढत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी गावांपासून महानगरांतपर्यंत लोकांनी सतर्क राहून मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना राबवाव्यात. एक कायमस्वरूपी यंत्रणा उभी करून, शाश्वत पर्यावरण विकासासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करणे आवश्यक आहे.

world soil day

देशातील बहुतांश राज्‍यांना धोका

देशातील एकूण भूभागापैकी २९.३२ टक्‍के भूभागाचे वाळवंटीकरण झाले आहे. २००३-२००५मध्‍ये हे क्षेत्रफळ ९४.५३ दशलक्ष हेक्‍टर इतके होते. ते देशाच्‍या एकुण क्षेत्रफळाच्‍या २८.७६ टक्‍के होते. वाळवंटीकरणात सर्वाधिक वाटा असणार्‍या राज्‍यांमध्‍ये राजस्‍थान, महाराष्‍ट्र, गुजरात, जम्‍मू-काश्‍मीर, कर्नाटक, झारखंड, ओडिशा, मध्‍य प्रदेश, तेलगंणा याचा समावेश आहे. विशेष म्‍हणजे राजस्‍थान, झारखंड, दिल्‍ली, गुजरात गोवा राज्‍यांमध्‍ये ५० टक्‍के भूभागाचे वाळवंटीकरण होत आहे. दिलासादायक बाब म्‍हणजे मागील काही वर्षांमध्‍ये राबविण्‍यात आलेल्‍या उपाययोजनांमुळे तेलंगणा, राजस्‍थान ओडिशा आणि उत्तर प्रदेशमधील वाळवंटीकरणाचा वेग मंदावला आहे.

वाढत्‍या वाळवंटीकरण संकटाचा सामना करण्‍यासाठी उपलब्‍ध जमिनीची उत्‍पादकता वाढवणे, वर्षाला अधिक पिके घेण्‍यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्‍साहन देणे, जमिनीची धूप कमी होण्‍यासाठीच्‍या अतिपाण्‍याचा वापर टाळणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्‍यासाठी उपाययोजना करणे, बेसुमार वृक्षतोडीला लगाम घालणे, आपल्‍या नैसर्गिक साधन सामग्रीचा पुनर्वापर करणे अशा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची आवश्‍यकता असल्‍याचे या क्षेत्रातील अभ्‍यासक सांगतात.

संकट तीव्र होण्‍यापूर्वी उपाययोजना आवश्‍यक

संपूर्ण जगाच्‍या वाढत्‍या लोकसंख्‍येचा विचार करता पुढील ९ वर्षांमध्‍ये अन्‍न उत्‍पादनास अतिरिक्‍त ३०० दशलक्ष हेक्‍टर जमीन लागणार आहे. दुष्‍काळ व वाढते वाळवंटीकरण रोखण्‍यासाठी करण्‍यात येणार्‍या उपाययोजनांमध्‍ये राजकीय इच्‍छाशक्‍तीबरोबरच लोकसहभागही तेवढाच महत्‍वाचा आहे. व्‍यापक प्रबोधनातून भावी पिढीच्‍या सुरक्षेसाठी सर्वांनीच उपाययोजनांमध्‍ये सहभागी होणे गरजेचे आहे.

वाळवंटीकरण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना

1. मातीचे आरोग्य आणि सुपीकता राखणे

यामध्ये कृषी पद्धतींचा समावेश आहे ज्यात मातीची रचना सुधारताना मातीत पाणी आणि पोषक तत्वांचे उत्तम व्यवस्थापन करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. धूप आणि क्षारपड होण्यापासून रोखण्यावरही शेतकरी लक्ष केंद्रित करतात. यासाठी काही प्रभावी पद्धती म्हणजे बिनतोड शेती, बदली पिके, कंपोस्टचा वापर आणि अचूक शेती. ही तंत्रे मातीत सेंद्रिय पदार्थ तयार करण्यास मदत करतात. अशा प्रकारे त्यांची दीर्घकालीन उत्पादकता टिकवून ठेवतात.

2. कुरणासाठी वापरल्या जाणार्‍या जमिनींमध्ये पोषकता वाढवा

शेतकऱ्यांनी कुरणांचे अशा प्रकारे व्यवस्थापन केले पाहिजे की, माती आणि गवताचे जास्त नुकसान होणार नाही. आणि गवत वाढण्यास मदत होईल. दीर्घकालीन शाश्वतता प्राप्त करण्यास मदत करणाऱ्या पद्धतींमध्ये जमीन पुर्ववत करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. नायट्रोजनयुक्त घटक माती समृद्ध करतात आणि प्राण्यांसाठी अतिरिक्त पोषक तत्वे प्रदान करतात. उदाहरणार्थ, अन्न आणि कृषी संघटना (FAO) चरलेल्या जमिनीवर मेस्किट झाडे लावण्याची शिफारस करते, जी एक शेंगायुक्त वनस्पती आहे जी प्रथिने समृद्ध शेंगा देते.

दुष्काळाच्या काळात शेंगा जनावरांना खायला दिल्या जाऊ शकतात. आणि उष्ण दिवसात जनावरांना त्याची सावलीही मिळते. मातीची धूप होण्यापासून स्थिर करते. हे झाड अत्यंत प्रतिरोधक, दुष्काळाचा सामना करण्यास सक्षम आणि वाढीव क्षारता असलेल्या जमिनीवर देखील वाढण्यास सक्षम म्हणून ओळखले जाते.

3. लागवडीखालील जमिनींवर जैवविविधतेत वाढ

कोरडवाहू जमीन ही अशी जमीन असते जिथे लागवड करताना विचार करून पीक घ्यावे लागते. बांधावर झाडे लावणे, त्याची निगा राखणे जमिनीसाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. झाडे ही सोसाट्याच्या वाऱ्यापासून मातीचे संरक्षण करतात. पाण्याचा प्रवाह कमी करा. सूर्याच्या उष्णतेपासून मातीचे संरक्षण करा जेणेकरून ते जास्त काळ ओलावा टिकवून ठेवेल. झाडांमुळे वादळातदेखील पिकांचे होणारे नुकसान टाळता येते.

world soil day

4. शेती उत्पादनात विविधता म्हणजे आंतरपीक 

जेव्हा शेतकरी एकाच प्लॉटमध्ये दोन किंवा अधिक पिके लावतात. एकमेकांना पूरक असलेल्या पिकांचे एक सामान्य उदाहरण म्हणजे मका आणि सोयाबीनचे. परंतु या पद्धतीचे यश सुनिश्चित करणारी केवळ पारंपारिक पिकेच असावीत असे नाही, स्थानिक बियाण्यांच्या विविधतेवर लक्ष केंद्रित केले जाते आणि पिकांच्या जाती उत्तम उत्पादन देऊ शकतात. कारण या वनस्पती विकसित झाल्या आहेत आणि परिसरातील हवामानाशी जुळवून घेत आहेत, ज्यामुळे त्यांना अतिरिक्त लवचिकता मिळते.

5. मूळ जंगलांचे संरक्षण आणि वृक्ष लागवड

मातीची धूप होण्यापासून संरक्षण करणे, ओलावा पुरवठा करणे आणि सभोवतालचा परिसर थंड करणे यात झाडे महत्वाची भूमिका बजावतात. ज्या ठिकाणी जंगलतोड आधीच झाली आहे, त्या ठिकाणी मूळ वृक्षांची पुनर्रोपण करण्याचे आणि मूळ परिसंस्था पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले पाहीजेत. योग्य झाडांच्या प्रजाती मातीत जैविक क्रिया पुन्हा सुरू करू शकतात. झाडांच्या मूळ प्रजातींना प्राधान्य दिले पाहिजे कारण ते स्थानिक हवामानाशी विशेष जुळवून घेतात आणि इतर स्थानिक प्रजाती टिकवून ठेवतात.

हेही वाचा :

Back to top button