किल्ले सिंहगडावर खाऊ गल्ली सुरू; खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तात्पुरती जागा | पुढारी

किल्ले सिंहगडावर खाऊ गल्ली सुरू; खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तात्पुरती जागा

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिन्यात वन विभागाने अतिक्रमणांवर कारवाई करून सिंहगड किल्ला व गडाच्या मार्गावरील 138 खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या टपर्‍या, हॉटेल हटविले होते. त्यानंतर रविवारी गडावर प्रथमच नव्याने खाऊ गल्ली सुरू झाली. 25 ते 30 विक्रेत्यांनी वन खात्याने दिलेल्या जागेत झुणका-भाकर, कांदाभजी आदी खाद्यपदार्थांसह दही-ताक, सरबताची विक्री केली.

विक्रेत्यांवर कारवाई केल्यापासून लागोपाठ तीन आठवडे अन्न-पाण्याअभावी हलाखीला तोंड द्यावे लागले. रविवारी मात्र मध्यवर्ती ठिकाणी खाद्यपदार्थ मिळाल्याने पर्यटकांची गैरसोय दूर झाली. नोंदणी असलेल्या 71 खाद्यपदार्थ विक्रेत्यांना खाऊ गल्लीत स्टॉलसाठी जागा देण्याचे नियोजन वन विभागाने केले आहे. गडाच्या पठारावरील पर्यटन विकास महामंडळाजवळील जागा गैरसोयीची असल्याने तेथे
खाद्यपदार्थ विक्री करण्यास विक्रेत्यांनी विरोध केला आहे.

विक्रेत्यांचे स्टॉल हटविल्याने गेल्या रविवारी गडावर अन्न, पाणी न मिळाल्याने पर्यटकांची गैरसोय झाली होती. अतिक्रमण कारवाई केल्यापासून गडाच्या पायथ्याला डोणजे गोळेवाडी टोल नाक्यावर स्पीकर लावून पर्यटकांना गडावर जाताना अन्न-पाणी घेऊन जाण्याचे आवाहन वन विभागाकडून केले जात होते.

घाटरस्त्यावर वाहनांच्या रांगा
सिंहगडावर दिवसभर पर्यटकांची वर्दळ सुरू होती. त्यामुळे डोणजे, गोळेवाडी व कोंढणपूर मार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. घाटरस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात गडावर पर्यटकांची चारचाकी 544 व दुचाकी 1366 वाहने आल्याची नोंद झाली. वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ यांच्या देखरेखीखाली गडावरील वाहनतळ, घाटरस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे काही अपवाद वगळता पर्यटकांची गैरसोय झाली नाही.

गडावरील वन खात्याच्या विश्रामगृहाशेजारच्या पठारावर 25 ते 30 विक्रेत्यांनी विविध खाद्यपदार्थांची विक्री केली. त्यासाठी विक्रेत्यांना जागा आखून देण्यात आली आहे. गडावर येणार्‍या पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून विक्रेत्यांना तात्पुरती जागा देण्यात आली आहे. मात्र, अद्याप विक्रेत्यांना अधिकृतपणे जागा देण्यात आली नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर लवकरच निर्णय घेतला जाईल.
                                                                       – बाबासाहेब लटके,
                                                         वन परिमंडलाधिकारी, सिंहगड वन विभाग

Back to top button