नाशिक : आश्रम, वसतिगृहांतील गैरप्रकारांना जबाबदार कोण? | पुढारी

नाशिक : आश्रम, वसतिगृहांतील गैरप्रकारांना जबाबदार कोण?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
म्हसरूळ आणि त्र्यंबक येथील आश्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार घडूनही त्याबाबत प्रशासनाकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याने संबंधित अधिकारीच अशा आश्रमचालकांना आणि व्यवस्थापनाला पाठीशी घालतात की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधित यंत्रणांकडून आश्रमांबाबत दरवेळी होणार्‍या तपासणींमध्ये कोणत्याही त्रुटी आढळून आल्या नाहीत की बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या आश्रमांकडे यंत्रणेनेच दुर्लक्ष केले, असा प्रश्न या निमित्ताने समोर ठाकला आहे.

म्हसरूळ येथे सुरू असलेल्या आश्रमशाळेतील अनेक अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची बाब समोर आली आणि त्याआधी आधारतीर्थ आश्रमातील लहानग्याची हत्या झाल्याच्या प्रकरणाने या व्यवस्थेतील अनेक बाबी समोर आल्या आहेत. महिला व बालकल्याण विभाग, समाजकल्याण विभाग आणि आदिवासी विभागाच्या अखत्यारित या आश्रमशाळा, वसतिगृह तसेच आश्रम येतात. या विभागांकडून त्यांच्या यंत्रणेमार्फत दर सहा महिने तसेच वर्षाने तपासणी करून त्याचा अहवाल सादर केला जातो. या तपासणीच्या आधारेच आश्रमांना अनुदान, सवलती तसेच नूतनीकरणाचे परवाने दिले जातात. असे असताना गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाटपणे आणि बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या शहरालगत व शहरातील आश्रमांकडे यंत्रणांचे लक्ष जाऊ नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असून, कुठेतरी पाणी मुरत असून, जिल्हा प्रशासनाने तसेच शासनानेच या बाबींकडे लक्ष देऊन संबंधित आश्रम तत्काळ बंद करून संबंधित अधिकार्‍यांचीही चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. म्हसरूळ आणि त्र्यंबक येथील आश्रमातील गैरप्रकार व घटना समोर आल्याने या आश्रमातील कारभाराची चौकशी होईल. परंतु, अशाच प्रकारे कोणत्याही प्रकारच्या परवानगी वा कायदेशीर नसलेल्या इतर आश्रमशाळा, आश्रम, वसतिगृहांची चौकशी जिल्हा प्रशासनाकडून होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. समाजकल्याण, आदिवासी आणि महिला व बालकल्याण विभागातील काही अधिकारी चिरीमिरी घेऊन आश्रमशाळांचा कारभार एकदम ओक्के असल्याचा अहवाल देऊन एकप्रकारे गैरप्रकारांनाच पाठीशी घालत आहेत.

देणगी देताना खात्री करा
अनाथ आश्रम, आश्रमशाळा किंवा वसतिगृह कायदेशीर आहे की नाही याची खात्री करूनच दानशूर व्यक्ती वा संस्थांनी संबंधित आश्रमांना देणगी दिली पाहिजे. जेणेकरून योग्य संस्थेलाच आपली रोख रक्कम किंवा वस्तूरूपी भेट जाऊ शकेल. अनेक आश्रमांची नोंद नसते किंवा धर्मादाय आयुक्तांकडे केवळ संस्थेची नोंद केली जाते आणि त्या नोंदीच्या आधारेच आश्रम उभारले जात असल्याचे समोर आले आहे. आश्रमांसाठी स्वतंत्रपणे त्या-त्या विभागाकडे नोंद करून पात्रतेसाठी सर्व निकष पूर्ण करावे लागतात.

हेही वाचा:

Back to top button