नाशिक जिल्ह्यातील बालकाश्रम, वसतिगृहांची होणार तपासणी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश | पुढारी

नाशिक जिल्ह्यातील बालकाश्रम, वसतिगृहांची होणार तपासणी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वरच्या आधाराश्रमातील बालकाची हत्या आणि पंचवटीतील खासगी वसतिगृहातील मुलींवरील अत्याचाराच्या घटना गंभीर आहेत. बालके व मुलींच्या सुरक्षित जीवनाला प्राधान्य असून, भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत व अनोंदणीकृत बालकाश्रमांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यात त्र्यंबकेश्वरच्या तुपादेवी फाटा येथील आधारतीर्थ आश्रमात चारवर्षीय बालकाच्या हत्येची घटना उघडकीस आली. तसेच नाशिक शहरात पंचवटी येथे नोंदणीकृत नसलेल्या खासगी वसतिगृहचालकाने सहा मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. या दोन्ही घटनांमुळे जिल्हा हादरला असून, समाजातील विविध स्तरांतून यावर राेषही व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी लागोपाठच्या घटनांमुळे जिल्ह्यातील बालकाश्रम व वसतिगृहांमधील वास्तव्यास असलेली बालके व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या सर्व प्रकारची गांभीर्याने दखल घेतली आहे.

जिल्ह्यातील बालकांचे संगोपन करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांची नियमित तपासणी केली जाते. मात्र, गेल्या आठवड्यातील दोन्ही प्रकार गंभीर आहेत. त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीतील घटनेबाबत महिला व बालकल्याण तसेच पोलिसांकडून सविस्तर माहिती मागविली आहे. बालके व मुलींची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे. तसेच भविष्यामध्ये असे प्रकार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे गंगाथत्न डी. यांनी स्पष्ट केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नोंदणीकृत व अनोंदणीकृत बालकाश्रम व वसतिगृहांची समाजकल्याण तसेच महिला व बालकल्याण विभागांमार्फत तपासणी केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सखोल तपासणी होणार

जिल्ह्यातील नोंदणीकृत व अनोंदणीकृत संस्थांच्या तपासणीत तेथील रजिस्टर, नोंदणीची कागदपत्रे, आश्रमात बालके व मुलींसाठी पुरविण्यात आलेल्या सुविधांसह अन्य बाबींची तपासणी केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे किमान येत्या काळात त्र्यंबक व पंचवटीसारख्या घटनांना चाप बसणार आहे.

हेही वाचा :

Back to top button