राहुरीत 11 ग्रामपंचायतींचे कारभारी कोण? निवडणुकीसाठी तनपुरे-विखेंसह कर्डिलेंची प्रतिष्ठा पणाला | पुढारी

राहुरीत 11 ग्रामपंचायतींचे कारभारी कोण? निवडणुकीसाठी तनपुरे-विखेंसह कर्डिलेंची प्रतिष्ठा पणाला

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींचा फड चांगलाच तापला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रंगीत तालीम असल्याने या निवडणुकांकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. तनपुरे, कर्डिले व विखे समर्थक ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी सर्वस्व पणाला लावत राजकीय मैदानात उतरल्याने 11 गावांचे गाव कारभारी कोण ठरणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राहुरी तालुक्यामध्ये अग्रगण्य समजल्या जाणार्‍या आरडगाव, सोनगाव, मानोरी, केंदळ खुर्द, ताहाराबाद, तुळापूर, कोल्हार खुर्द, खडांबे खुर्द, कोंढवड, मांजरी, ब्राम्हणगाव भांड या ग्रामपंचायत निवडणुकीचा फड तापल्यानंतर आ. प्राजक्त तनपुरे यांसह माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी कार्यकर्त्यांच्या गुपीत बैठका घेतल्या.

आपल्या समर्थकांना कानमंत्र दिल्यानंतर प्रवरा हद्दीतून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. व पुत्र खा. डॉ. सुजय विखे पा. यांचा आशिर्वाद घेत विखे समर्थकांनीही आपली व्यूवहरचना संबंधित 11 ग्रामपंचायत निवडणुकीत आखली आहे. राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचा धडाका सुरू असताना राहुरी तालुक्यातील संबंधित 11 ग्रामपंचायत निवडणुकांबाबत आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे. आ. तनपुरे यांनी राहुरीचे लोकप्रतिनिधी पद मिळविल्यानंतर राज्यातील मंत्रीमंडळात वर्णी लावली होती. राज्यात 6 खात्यांचे राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर तनपुरे यांनी आपल्या विकास कामांच्या जोरावर विरोधकांनाही आपलेसे करीत राहुरीत एकहाती सत्ता राखण्याकडे आगेकूच केली होती, परंतु राज्यात सत्ताबदल झाला.

महाविकास आघाडी फुटल्यानंतर सेनेचे एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापण करीत शिंदे-फडणवीस शासन राज्यात आले. परिणामी राहुरीत राष्ट्रवादीचे गतीमान फिरणारे काटे काहीसे स्थिरावले. राष्ट्रवादीचे घड्याळ धीमे झाल्याचे पाहत भाजपच्या नेत्यांना बळ संचारला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना गळाशी लावत असताना ग्रामीण भागातही भाजपने ताकद दाखविण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे राहुरीत तनपुरेंना शह देण्यासाठी विखे-कर्डिले यांची एकी कितपत यशस्वी ठरणार, यासाठी निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

मानोरी ग्रामपंचायतीच्या मागील निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच आब्बासभाई दयावान यांनी दोन्ही प्रतिष्ठित राजकीय गटांना शह देत अपक्षाचा झेंडा ग्रामपंचायतीवर फडकावला होता. त्यामुळे यंदा मानोरीत तनपुरे-विखे-कर्डिले गटाची सावध भूमिका पहावयास मिळत आहे. यासह राहुरी तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतीमध्ये विखे-कडू संघर्ष हा जुना असला तरीही त्यास नव्याने धार लाभली आहे. त्यामुळे सोनगाव ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व राखण्यासाठी विखे-तनपुरे यांनी प्रत्यक्ष लक्ष घातल्याचे दिसत आहे.

आरडगाव ग्रामपंचायतीमध्ये मागिल निवडणुकीत राष्ट्रवादीने एकहाती वर्चस्व राखले होते. भाजपचे पानीपत झाल्यानंतर परिवर्तनाचा झेंडा हाती घेत भाजप समर्थकांनी आरडगाव साठी कंबर कसल्याचे दिसते, परंतु आरडगावमध्ये मध्यंतरीच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजनने दोन्ही प्रतिष्ठीतांना धुळ चारल्याने वंचितच्या लढतीकडे लक्ष लागले आहे.

कोंढवड ग्रामपंचायतीमध्ये मागिल काळात विकास मंडळाचे उत्तमराव म्हसे यांनी राष्ट्रवादी-सेना व भाजपला सोबत सत्ता स्थापण केली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नेमकी कोणाची खिचडी शिजणार? याबाबत कोंढवड गावामध्ये खलबते शिजत आहे. ताहाराबाद या संत महिपती महाराजांच्या पावन भूमीत आपल्या सत्तेचा झेंडा रोवण्यासाठी सर्वच पक्षांनी आगेकूच केल्याचे दिसत आहे.यासह केंदळ खुर्द, खडांबे खुर्द, कोल्हार खुर्द, ब्राम्हणगाव भांड, तुळापूर, मांजरी या गावांमध्ये सर्वच गाव पुढार्‍यांनी ग्रामपंचायतीचा ताबा घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

अर्ज भरण्यास मुहूर्त नाहीच…!

ग्रामपंचायतीचे अर्ज भरण्यास प्रारंभ होऊन दोन दिवस उलटले, परंतु इच्छुक उमेदवारांना अजून अर्ज भरण्याचा मुहूर्त लाभला नसल्याचे चित्र दिसत आहे. तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ज भरणार्‍यांची संख्या निरंक आहे. 2 डिसेंबरपर्यंत अर्ज भरले जाणार आहे. दि. 5 रोजी छाननी तर 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. 18 डिसेंबरला मतदान होऊन दि. 20 डिसेंबर रोजी उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशिनमधून उघडले जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली आहे.

प्रवरा पट्ट्याचे निकाल महत्त्वपूर्ण ठरणार

विखे गटाचे प्राबल्य दर्शविणारे सोनगाव, तुळापूर, कोल्हार खुर्द या प्रवरा पट्ट्याच्या निकालावर आगामी निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार आहे. प्रवरा पट्ट्यामध्ये विखे यांच्यासह तनपुरे-कर्डिले गटाने निवडणुकीची तयारी जोमात केली आहे. त्यामुळे प्रवरा पट्ट्यासह 11 गावांचे निकाल धक्कादायक ठरतील, अशी चर्चा राहुरी हद्दीत रंगत आहे.

Back to top button