बिबट्यांनी अडविला रस्ता; चिंचोली देशपांडे येथील घटना | पुढारी

बिबट्यांनी अडविला रस्ता; चिंचोली देशपांडे येथील घटना

मंचर; पुढारी वृत्तसेवा : पतसंस्थेच्या अधिकार्‍याचा रस्ता बिबट्या व त्याच्या दोन बछड्यांनी अडविला. तेथून कसेबसे निघाले असता पुढे लगेचच नर बिबट्याने रस्त्याच्या मध्ये उभे राहून गाडी थांबवली. चिंचोला देशपांडे (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (दि. 10) रात्री हा प्रकार घडला. या घटनेने गाडीतील सर्वजण घाबरून गेले होते. दैव बलवत्तर म्हणून वाचल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

मंचर येथील श्रीकृष्ण पतसंस्थेचे अधिकारी नीलेश हांडे हे पत्नी व मुलांसह वाढदिवसाच्या कार्यक्रमाला साकोरे (ता. आंबेगाव) येथे गेले होते. श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग ते साकोरे यादरम्यान घोड नदीवर पूल नसल्याने त्यांना नारोडीमार्गे जावे लागले. रात्री वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून तिघेही कारने घरी निघाले होते. घोड नदीवरील पुलावरून नारोडी गावात आले. तेथून पुढे रस्ता निर्मनुष्य होता.

रस्त्याच्या दुतर्फा उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. दरम्यान, नारोडी व चिंचोडी गावच्या हद्दीवर एक मादी बिबट्या दोन बछड्यांसह रस्त्यावर ठाण मांडून बसली होती. एकाच वेळी तीन बिबटे पाहून हांडे कुटुंबीयांची पाचावर धारण बसली. जीव मुठीत धरून सर्वजण गाडीत बसून राहिले. त्यांनी गाडी जागेवर उभी केली. रस्त्यात बसलेल्या बिबट्याने गाडीकडे कटाक्ष टाकला व उसाच्या शेतात बछड्यांसह निघून गेला.

या घटनेनंतर नीलेश हांडे यांनी गाडी पुढे घेतली. काही अंतर पुढे गेल्यानंतर चिंचोडी गावठाणच्या अलीकडे रस्त्याच्या मधोमध एक नर बिबट्या उभा होता. गाडीकडेच पाहत असलेल्या बिबट्यामुळे हांडे यांच्या गाडीतील मुलगा स्वराज घाबरला. परंतु, नीलेश हांडे यांनी धाडसाने गाडीचा डिपर दिला. त्यामुळे बिबट्या बाजूला निघून गेला. एकाच वेळी चार बिबट्यांचे दर्शन झाल्याने हांडे कुटुंबीयांची पाचावर धारण बसली होती. देवाच्या कृपेने आपण वाचल्याचे त्यांनी सांगितले.

चिंचोडी व श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग परिसरात उसाचे क्षेत्र जास्त आहे. शिवाय येथून घोड नदी वाहत असल्याने बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. बिबट्याचे संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने हा परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरा लावावा, अशी मागणी लांडेवाडी चिंचोडी गावचे माजी उपसरपंच राजेंद्र अंशीराम शेवाळे यांनी केली.

Back to top button