पुणे : सीरम इन्स्टिट्यूटला फसवणारे गजाआड | पुढारी

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटला फसवणारे गजाआड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवून इन्स्टिट्यूटला एक कोटी रुपयांचा गंडा घालणार्‍या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी बिहार येथून बेड्या ठोकल्या. रवींद्र कुमार हुबनाथ पटेल (वय 34, रा. उत्तर प्रदेश), राजीवकुमार शिवजी प्रसाद (वय 27), चंद्रभूषण आनंद सिंग (वय 37), कन्हैया कुमार संभू म्हाणतो (वय 22, रा. तिघेही बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मात्र, मुख्य सूत्रधार अद्याप फरारी आहे.

फसवणूक केलेले पैसे चौघा आरोपींच्या बँक खात्यावर जीएसटीचे पैसे आल्याचे सांगून घेण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार बंडगार्डन पोलिसांनी चौघांना अटक केली. फसवणुकीचा हा प्रकार 7 ते 8 सप्टेंबरदरम्यान घडला. याप्रकरणी सीरम इन्स्टिट्यूटचे फायनान्स अधिकारी सागर कित्तूर (वय 44, रा. कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कित्तूर हे सीरम इन्स्टिट्यूटमध्ये फायनान्स व्यवस्थापक आहेत़, तर सतीश देशपांडे हे कंपनीचे संचालक आहेत. आदर पूनावाला हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे़त. पूनावाला यांच्या नंबरवरून बनावट व्हॉट्सअ‍ॅप मेसेज देशपांडे यांना आले. त्यात काही बँक खात्यांचे नंबर देऊन त्यावर तत्काळ पैसे पाठविण्यास सांगितले.

हे मेसेज खरे वाटल्याने कंपनीच्या खात्यावरून विविध बँक खात्यांवर एकूण 1 कोटी 1 लाख 1 हजार 554 रुपये पाठविण्यात आले. मात्र, हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आल्यावर कंपनीकडून पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना हा गुन्हा बिहार येथील आरोपींनी केल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, गुन्हे निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने 6 नोव्हेेंबरला बिहार येथून आरोपींना ताब्यात घेतले.

Back to top button