सरपंच व प्रहार पदाधिकारी यांच्यात राजेगावला मारहाण | पुढारी

सरपंच व प्रहार पदाधिकारी यांच्यात राजेगावला मारहाण

रावणगाव; पुढारी वृत्तसेवा : राजेगाव (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व प्रहार संघटनेच्या दौंड तालुका समन्वयक यांच्यात शुक्रवारी (दि. 11) सकाळी कार्यालयात व कार्यालयासमोर फिल्मी स्टाईलने दे-दणादण मारहाण झाल्याने परिसरात सर्वत्र हा विषय चर्चेचा ठरला. राजेगावचे सरपंच प्रवीण ऊर्फ माऊली लोंढे व प्रहार संघटनेचे दौंड तालुका समन्वयक रमेश शितोळे यांच्यात सकाळी कार्यालयात व कार्यालयाबाहेर ग्रामपंचायतीच्या कारभारावरून जोरदार मारामारी झाली.

रमेश शितोळे यांच्या पत्नी सीमा शितोळे या चालू पंचवार्षिकमध्ये सदस्य आहेत. त्यांनी सरपंच लोंढे यांच्याबरोबर पूर्वी एकत्रित उपसरपंचपददेखील भूषविले आहे. शितोळे हे प्रहार संघटनेच्या माध्यमातून सामाजिक काम जोपासतात. त्यांचा सरपंच लोंढे यांच्याशी कामकाजावरून व रेशनिंग दुकानावरून नेहमीच खटका उडत असे.

रमेश शितोळे हे व्हॉट्सअ‍ॅप व स्टेट्सद्वारे नेहमीच लोंढे यांना टार्गेट करीत होते. गुरुवारी (दि. 10) ग्रामसभा झाली. यामध्ये शितोळे यांनी लोंढे यांना कामकाजाविषयी काही माहिती मागितली होती. सभेतदेखील त्या दोघांमध्ये शाब्दिक तू तू-मैं मैं झाले होते. शुक्रवारी त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. या भांडणात सरपंच यांचे नातेवाईक मध्ये येऊन त्यांनीदेखील शितोळे यांना मारहाण केल्याचे समजते. भर पेठेत मारहाण झाल्याने हा विषय चर्चेचा बनला.

याप्रकरणी दौंड पोलिसात उशिरापर्यंत दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्याचे कामकाज चालू असल्याची माहिती ठाणे अंमलदार यांनी दिली. याबाबत रमेश शितोळे यांच्याशी भ—मणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांचा फोन स्विचऑफ होता, तर सरपंच माऊली लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही सध्या दौंड पोलिस ठाण्यात आहोत, परंतु या प्रकरणी अद्यापही फिर्याद दाखल केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button