नाशिक : वीकेण्डच्या गर्दीवर अंकुश, रतनगडावर तीनशे पर्यटकांनाच प्रवेश | पुढारी

नाशिक : वीकेण्डच्या गर्दीवर अंकुश, रतनगडावर तीनशे पर्यटकांनाच प्रवेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यभरातील गडकिल्ल्यांवर पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी होत असते. अनियंत्रित गर्दीमुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी अर्थात रविवारी (दि.31) कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील रतनगड येथे हौशी पर्यटकांची झुंबड उडाली होती. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून वन्यजीव विभागाने रतनगड परिसरात वीकेण्डला येणार्‍या पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा घातली आहे. केवळ तीनशे पर्यटकांना रतनगड परिसरात प्रवेश दिला जाणार आहे.

यंदा वरुणराजा सर्वदूर बरसल्यानंतर सर्वत्र निसर्गाचे कोंदण लाभले आहे. पाऊस थांबल्याने तसेच थंडीची चाहूल लागल्याने रतनगड आणि भंडारदरा परिसरात पर्यटकांची पावले वळत आहेत. पुणे, नगर, नाशिक, मुंबई, ठाणे आदी शहराहसह आजूबाजूच्या विविध भागांतून पर्यटक वीकेण्डला अभयारण्य परिसरात गर्दी करत आहेत. विशेषत: शनिवारी-रविवारी सुटीचा मुहूर्त साधत पर्यटक रतनगडावर जातात. स्थानिक वनकर्मचार्‍यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत गडावरील आलेल्या पर्यटकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे वन्यजीव विभागाच्या निदर्शनास आले आहे.

वीकेण्डला रतनगडावर पर्यटकांची होत असलेली गर्दी लक्षात घेता यापुढे शनिवारी-रविवारी केवळ पहिल्या तीनशे पर्यटकांना परवानगी देण्याचा निर्णयाचा वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी घेतला. जे पर्यटक विनापरवानगी अथवा सूचना देऊनही रतनगडावर नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास येताच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही वन्यजीव विभागातर्फे देण्यात आले आहेत.

चेकपोस्टवर होणार तपासणी
वन्यजीव विभागाच्या शेंडी व भंडारदरा चेकपोस्टवर पर्यटकांची तपासणी केली जाणार आहे. पर्यटकांच्या पर्यटन शुल्क पावतीवर रतनगड प्रवेशासंदर्भात शेरा देऊन त्यांना रतनगडावर पर्यटनासाठी प्रवेश दिला जाईल. त्यासाठी स्थानिक वनकर्मचारी व संरक्षण मजुरांची मदत घेतली जाणार आहे.

रतनगडावर प्रमाणापेक्षा जास्त पर्यटकांची गर्दी झाल्यास अपघाताची शक्यता आहे. कल्याण दरवाजा अरुंद असल्याने बुरूज धोकादायक बनल्याने पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर वीकेण्डला रतनगडावर येणार्‍या पर्यटकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.
– गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक, कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य

हेही वाचा :

Back to top button