चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूचा वार | पुढारी

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूचा वार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेला चाकूचा वार स्वतःच्या मुलाला वर्मी लागून गंभीर जखमी केल्याप्रकरणी पती विशाल विठ्ठल इनामदार (रा. पिंपरी खटाव, ता. सातारा) याच्यासह एका अनोळखी साथीदाराविरुद्ध वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारेकरी पती विशाल इनामदार आणि त्याचा साथीदार फरार झाला असून पोलिसांनी जेरबंद करण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

फिर्यादी पत्नी योगिनी हिचा संशयित आरोपी विशाल इनामदार याच्याबरोबर 2015 साली विवाह झाला होता. या दाम्पत्यांना एक मुलगा आहे. दरम्यान, चारित्र्याचा संशय घेऊन वारंवार त्रास देत असल्याने सन 2018 पासून विभक्त राहतात. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना पत्नी व मुलाला जीवे सोडणार नाही, अशी धमकी वारंवार दिली आहे.

दरम्यान 31 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता महामार्गावरील पूनम हॉटेल जवळ उभे असताना विना नंबरप्लेट असलेल्या मोपेडवरून आलेल्या पती विशाल इनामदार याने खिशातील धारदार चाकू काढून वार करताना मुलाच्या गळ्यावर आणि नाकावर वर्मी लागला. चाकूच्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाल्याचे पाहून हल्लेखोर पती विशाल इनामदार व त्याच्यासोबत असलेला अनोळखी साथीदार याने पलायन केल्याची फिर्याद पत्नी योगिनी इनामदार यांनी दिली आहे. याची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार पतंगराव रेणुशे करीत आहेत.

Back to top button