North Korea fires missile | उत्तर कोरियाने डागली १० क्षेपणास्त्रे, दक्षिण कोरियाकडून रेड अलर्ट जारी, नागरिकांना बंकरमध्ये जाण्याचे आदेश | पुढारी

North Korea fires missile | उत्तर कोरियाने डागली १० क्षेपणास्त्रे, दक्षिण कोरियाकडून रेड अलर्ट जारी, नागरिकांना बंकरमध्ये जाण्याचे आदेश

सेऊल : पुढारी ऑनलाईन; उत्तर कोरियाने बुधवारी विविध प्रकारची किमान १० क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त AFP या वृत्तसंस्थेने दिले आहे. (North Korea fires missile) या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने एअर रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तर कोरियाने बुधवारी समुद्राच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने त्याच्या पूर्वेकडील बेटावर रेड अलर्ट जारी केला. उत्तर कोरियाच्या या आगळिकीमुळे उभय देशांमधील संघर्ष आणखी वाढला आहे. उत्तर कोरियाने चाचणी घेण्यासाठी डागलेली क्षेपणास्त्रे दक्षिण कोरियाच्या समुद्री पाण्याच्या हद्दीजवळ पडल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या सैन्यदलाने दिली आहे.

उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागल्याने उलेयुंगडो बेटावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता, जॉइंट चीफ ऑफ स्टाफ (जेसीएस) ने नागरिकांना बंकरमध्ये जाण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर कोरियाने आज विविध प्रकारची किमान १० क्षेपणास्त्रे पूर्व आणि पश्चिमेच्या दिशेने डागली. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी उत्तर कोरियाला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिल्याचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफने म्हटले आहे. दक्षिण कोरियाने म्हटले आहे की उत्तर कोरियाने डागलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पहिल्यांदाच वादग्रस्त सागरी सीमेच्या दक्षिणेस आणि दक्षिण कोरियाच्या समुद्रातील पाण्याच्या हद्दीजवळ पडले आहे.

“उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी असामान्य आणि अस्वीकार्य आहे. कारण त्यांनी डागलेली क्षेपणास्त्रे उत्तर सीमा रेषा ओलांडून दक्षिणेकडील दक्षिण कोरियाच्या समुद्री पाण्याच्या हद्दीजवळ येऊन पडली आहेत. हे पहिल्यांदाच असे घडले आहे,” अशी माहिती जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे ऑपरेशन्स डायरेक्टर कांग शिन-चूल यांनी दिली आहे. “उत्तर कोरियाने पूर्व समुद्राच्या दिशेने तीन लहान-पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली, ज्याला जपानचा समुद्रदेखील म्हणतात,” असे जेसीएसने एका निवेदनात म्हटले आहे.

दक्षिण कोरियाने दिले चोख प्रत्युत्तर

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या तीन क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. दक्षिण कोरियाने म्हटले आहे की त्यांची तीन क्षेपणास्त्रे सागरी सीमेच्या त्याच भागात डागण्यात आली जिथे उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे येऊन पडली होती. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सूक-येओल यांनी उत्तर कोरियाने सीमा रेषेचे उल्लंघन करणे हे आक्रमण असल्याचे म्हटले आहे.

जपाननेही उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीची पुष्टी केली आहे. त्यांच्या तटरक्षक दलाने जहाजांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याआधीही अनेकवेळा उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या आहेत. उत्तर कोरियाचे हुकुमशाहा किम जोंग उन यांनी शेजारी देशांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याआधी उत्तर कोरियाने चक्क जपानवरुन क्षेपणास्त्र डागत (North Korea fires missile) चाचणी घेतली होती. यामुळे जपानमध्ये खळबळ उडाली होती. उत्तर कोरियाच्या या आगळिकीमुळे जपानने वॉनिंगचा सायरन वाजवत लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याची सूचना द्यावी लागली होती. तसेच जपानच्या उत्तर भागात बुलेट ट्रेन सेवा थांबवण्यात आली होती.

हे ही वाचा :

Back to top button