दाजीपूर रस्ता म्हणजे अपघाताला आमंत्रणच | पुढारी

दाजीपूर रस्ता म्हणजे अपघाताला आमंत्रणच

राशिवडे, प्रवीण ढोणे : परिते (ता. करवीर) ते गैबीदरम्यानच्या वीस कि.मी. अंतराच्या रस्त्याचे 2016 मध्ये रुंदीकरण पूर्ण झाले आहे. त्यानंतर गेली सहा वर्षे या रस्त्याची देखभाल दुरुस्ती केली जात आहे. निपाणी हद्द ते गैबीपर्यंतच्या राज्यमार्ग क्र. 178 रस्त्याचे काम निधीच्या कमतरतेमुळे कासवगतीने सुरू आहे.

कर्नाटककडून निपाणी, मुदाळ तिट्टा, राधानगरी व कोल्हापूरकडून भोगावती – राधानगरी, कोकणकडे दररोज सुमारे चार ते पाच हजार वाहनांची ये – जा होत असते. कोल्हापूर अथवा निपाणीकडून कोकणकडे जाणारा राधानगरी हा जवळचा मार्ग आहे. फोंड्याहून देवगड, रत्नागिरी अथवा कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, गोव्याकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. अवजड वाहनांसह प्रवाशी वाहने, पर्यटकांची मोठी वर्दळ असते; परंतु वाहतुकीसाठी असणारा रस्ता अपघातांना निमंत्रण देणारा तसेच प्रवाशांची हाडे खिळखिळी करणारा ठरत आहे.

निपाणी हद्द ते दाजीपूरपर्यंतच्या राज्यमार्ग क्र. 178 च्या 136 कि.मी. अंतराच्या रस्त्याचे काम कासवगतीनेच सुरू आहे. हायब—ीड अ‍ॅन्युटीअंतर्गत 40 ः 60 तत्त्वावर काम सुरू आहे. निधीची कमतरता, स्थानिक अडचणींमुळे काम धिम्या गतीने सुरू आहे. कोव्हिड आणि पावसामुळे काही काळ काम बंद राहिल्याने झालेल्या रस्त्याचे काम खराब झाले आहे. त्याच पद्धतीने परिते – गैबी रस्त्याची स्थिती आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम 2016 मध्ये पूर्ण झाले; परंतु त्यानंतर या रस्त्याची सहा वर्षे देखभाल दुरुस्ती केली जात आहे. हा रस्ता किरकोळ दुरुस्तीमुळे वाहतुकीस चांगला आहे. खिंडी व्हरवडे ते गैबीपर्यंतचा घाट रस्ता वाहतुकीस चांगला असला, तरी या रस्त्याचा वापर करण्यास टाळले जाते.

याउलट हळदी, राशिवडे, शिरगाव, कसबा तारळेहून राधानगरी शहराकडे जाणार्‍या रस्त्याचा वापर केला जातो. राधानगरी धरण ते दाजीपूरपर्यंतचा रस्ता वाहतुकीस चांगला असला, तरी मोर्‍यांचे काम न केल्याने रस्ता धोकादायक बनत आहे. पस्तीस कि. मी. अभयारण्यातून जाणार्‍या या रस्त्यामधील सुमारे सत्तर मोर्‍यांचे काम अपूर्णच आहे. काही अवजड वाहने, पर्यटक राऊतवाडी, दाजीपूर रस्त्याचा वापर सुरक्षित प्रवास म्हणून करताना आढळतात. हा रस्ता अभयारण्य आणि राधानगरी धरणाच्या बॅक वॉटरजवळून जात असल्याने पर्यटन म्हणून पर्यटक या रस्त्यावरून प्रवास करण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत.

राधानगरी बस स्टँड ते राधानगरी धरणापर्यंतचा पाच कि. मी.चा रस्ता मात्र वाहनधारकांना कसरत करायला लावणाराच ठरत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झाले असले, तरी सिमेंट-काँक्रिटीकरण वेळ मिळेल तसे सुरू आहे. निधी वेळेत उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे आणले जात आहे. त्यामुळे येथील बाजारपेठेतील व्यापार्‍यांना धुळीस सामोरे जावे लागत आहे. धुळीमुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता आहे. हा पाच कि.मी.चा रस्ता खड्ड्यांतच हरविल्याचे चित्र आहे.

दोन वर्षे कोव्हिडमुळे रस्त्यासाठी निधी आला नाही, तर पावसामुळे रस्ते खराब झाले. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे; परंतु ज्या ठिकाणी रस्ता चांगला आहे, त्याचा वापर होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्त्यासाठी निधी खेचून आणणे गरजेचे आहे. राधानगरी तालुका हा पर्यटनाच्या द़ृष्टीने पर्यटकांना नेहमीच खेचत असतो. राऊतवाडी धबधबा, दाजीपूर अभयारण्य, राधानगरी धरण, काळम्मावाडी धरण यासह निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी रस्त्याचा विकास महत्त्वाचा आहे.

राधानगरीत दोन राज्यमार्ग आहेत. त्यापैकी एक परिते-गैबी हा राज्यमार्ग क्रमांक 197 असून त्याची लांबी 20.800 कि.मी. आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम 2016-17 मध्ये पूर्ण करण्यात झाले. त्यानंतर या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात आलेले नाही. गेल्या पाच वर्षांत केवळ दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. तसेच देवगड – राधानगरी – मुरगूड – निपाणी हा दुसरा राज्य मार्ग क्रमांक 178 असून त्याची लांबी 70 कि.मी. आहे.

कोव्हिडचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टी यामुळे संथ गतीने सुरू होते. सद्यस्थितीत 45 ते 50 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम मे 2023 अखेर पूर्ण करून रस्ता वाहतुकीस सुरक्षित आणि खुला करण्याचे नियोजन सा. बां. विभागाने केले आहे. तसेच परिते-गैबी राज्य मार्ग क्रमांक 197 वरील रस्त्यावर आ. प्रकाश आबिटकर यांनी 2021-2022 अर्थसंकल्पामधून 16 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आवळी ते गैबी खराब लांबी लवकरच म्हणजे येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये दुरुस्त करून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करणेत येईल. उर्वरित लांबीमधील कामासाठी निधी प्राप्त करून घेऊन लवकरच रस्ता वाहतुकीस सुस्थिती करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस. बी. इंगवले यांनी सांगितले.

Back to top button