कोल्हापूर : वारीनेच दाखवली वाट अन्; सहा कुटुंबांचे आधार हरवले; घरची लक्ष्मीच गेल्‍याने नातेवाईक हताश | पुढारी

कोल्हापूर : वारीनेच दाखवली वाट अन्; सहा कुटुंबांचे आधार हरवले; घरची लक्ष्मीच गेल्‍याने नातेवाईक हताश

कोल्हापूर, गौरव डोंगरे : सर्जेराव सेंट्रिंगचे काम करायचा…. कष्टाच्या कामामुळे तो मद्यप्राशन करायचा. दोन वर्षांपूर्वी त्याला गावातील ज्येष्ठांनी वारीची वाट दाखवली. सर्जेरावचे दारूचे व्यसन सुटले… यंदा बायकोला घेऊन विठोबाच्या दर्शनाला सर्जेराव आणि त्याची पत्नी अनिता निघाले; पण वाटेत काळ आडवा आला. जुनोनीजवळ वारकरी दिंडीत घुसलेल्या मोटारीने सर्जेराव जाधव याला हिरावून नेले, तर पत्नी अनिताही गंभीर जखमी झाली. गावातील इतर चार कुटुंबांनीही घरची कर्ती महिला गमावल्याने गाव शोकसागरात बुडाला आहे.

जठारवाडीतील 25 वर्षांची पायी दिंडीची परंपरा असणार्‍या माऊली भजनी मंडळाच्या दिंडीमध्ये चारचाकी घुसून झालेल्या अपघातात 7 जणांना जीव गमवावा लागला. गावातील 32 जण कार्तिकी यात्रेसाठी गावातून निघाले होते. सोमवारी रात्री जुनोनी (ता. सांगोला) येथे हा अपघात घडला.

हातावरचे पोट… पांडुरंगाचे ध्यान

सर्जेराव जाधव आणि अनिता जाधव हे दाम्पत्य पायी दिंडीत सहभागी होते. सर्जेरावचे दारूचे व्यसन दिंडीमुळे सुटले होते. यंदा पती-पत्नी जोडीने पांडुरंगाच्या दर्शनाला निघाले होते. सर्जेराव सेंट्रिंगची कामे करीत होता. घरची परिस्थितीही हलाखीची असून शेडवजा घर आहे. दोन मुली असून त्या विवाहित आहेत. सर्जेरावचे हातावरचे पोट असल्याने अनेकांना त्याच्या कुटुंबाची काळजी असायची. अशातच अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने पत्नी एकाकी पडली आहे.

काटे कुटुंबावर आघात

गावातील सुभाष काटे हे जीएसटी विभागातून निवृत्त झाले आहेत. ते पत्नी सुनीतासोबत दिंडीत सहभागी झाले होते. सुनीता यांच्यासोबत आलेल्या रंजना बळवंत जाधव या दोघी नणंद- भावजयी आहेत. या अपघातात सुनीता व रंजना दोघींचा मृत्यू झाला, तर सुभाष काटे गंभीर जखमी झाले. काटे-जाधव कुटुंबातील दोन्ही कर्त्या महिला गमावल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

पतीची छाया बनलेल्या शांताबाई

शांताबाई जाधव यांनाही या अपघातात जीव गमवावा लागला आहे. शांताबाई या पती जयसिंग यांच्यासोबत शेती, दुग्ध व्यवसायात मदत करत होत्या. पहाटेपासून त्या सर्व कामाची धूरा एकट्या सांभाळत होत्या. त्यांच्या मागे पती, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. शांताबाई या पतीची छाया बनून सर्व कामांत हातभार लावत होत्या.

पोवार कुटुंब आणि अपघात

जठारवाडीतील सुनीता काटे यांच्या बहिणीची मुलगी सुशीला ऊर्फ सुनीता पोवार (रा. वळिवडे) या मुलासोबत पायी दिंडीत सहभागी झाल्या होत्या. सुशीला पोवार यांच्यासोबत त्यांचा लहान मुलगा गौरवही दिंडीत होता. गौरव सुरुवातीपासून दिंडीसोबत असणार्‍या वाहनात बसला होता, पण अपघातापूर्वी एक तास त्याने पायी चालणार असल्याचे सांगून सर्वांसोबत चालणे सुरूच केले होते. सुशीला पोवार यांच्या पतीचेही यापूर्वी अपघाती निधन झाले असून पोवार कुटुंबच अपघातांमुळे हिरावल्याची चर्चा गावात सुरू होती.

शारदा घोडके या त्यांच्या आई-वडिलांच्या घरी राहण्यास होत्या. गावातील महिलांसोबत माऊली भजनी मंडळातून त्या पंढरीच्या वारीला गेल्या होत्या. गावातील प्रत्येक कार्यात त्या हिरीरीने सहभागी होत असत.

Back to top button