झोटिंग समितीचा अहवाल : आ. एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार | पुढारी

झोटिंग समितीचा अहवाल : आ. एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भोसरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्ती झोटिंग समितीचा अहवाल विधिमंडळात सादर करावा, अशी मागणी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

भोसरी गैरव्यवहार प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून जिल्ह्यातील राजकारण तापलं असून, आ. एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. दोन दिवसांपूर्वी खडसेंनी जळगावात पत्रकार परिषद घेऊन, भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारवर गंभीर ताशेरे ओढल्याची माहिती दिली होती. या प्रकरणात सत्तेच्या तालावर तपास यंत्रणा नाचत आहे, असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवल्याचं खडसे म्हणाले.

सत्य समोर यायलाच हवं…
आ. एकनाथ खडसेंच्या आरोपांवर उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, या प्रकरणी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालंच पाहिजे. झोटिंग समितीचा अहवाल जनतेसमोर यायला हवा त्यात खडसेंना क्लीन चीट दिली आहे किंवा नाही हे समोर येईल. खडसे जर शुद्ध असतील तर सर्व गोष्टी बाहेर यायला हव्यात असेही गिरीश महाजन म्हणाले.

दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंना टोला…
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करून शेतकऱ्यांची विचारपूस केली. या दौऱ्यावरून गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांचा हा दौरा म्हणजे साप निघून गेल्यावर जमिनीवर काठी आदळण्याचा प्रकार होय, असा टोला महाजनांनी लगावला आहे.

हेही वाचा:

Back to top button