

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी आहे तेवढ्या शिक्षकांमध्ये प्रत्येक प्राथमिक शाळेला शिक्षक मिळण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहेत. यामध्ये मात्र काही शिक्षकांना काही दिवस या शाळेवर तर काही दिवस दुसर्या शाळेवर अध्यापन करावे लागत आहे. त्याचे कारण आहे रिक्त असलेली 191 पदे. उपस्थितांपैकी कोणी दीर्घ सुटीवर गेले, तर शेजारच्या शाळेतून शिक्षकांना पाठविण्यात येते.
पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची 191 पदे रिक्त आहेत. त्यामध्ये पेसा अंतर्गत असलेल्या शाळेत भागात 17 शिक्षकांची कमतरता आहे. उर्दू शाळांमध्ये सहा शिक्षक कमी आहेत. सध्या 11 हजार 84 शिक्षक कार्यरत आहेत. अगोदरच शिक्षकांची संख्या कमी असल्याने आरोग्य किंवा इतर कारणांनी दीर्घ सुटीवर गेलेल्या शिक्षकांची जागा भरून काढणे हे संबंधित गट विकास अधिकारी, केंद्र प्रमुखांना अवघड जात आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान न होऊ देणे हे डोळ्यांसमोर ठेवून कमी पटसंख्या असलेल्या शिक्षकांना रिक्त असलेल्या इतर शाळेत तात्पुरते जाण्यास सांगण्यात येते. त्यामध्येच राजकीय व्यक्तींच्या दबावालादेखील अधिकार्यांना सामोरे जावे लागते.
काही दिवसांपूर्वी प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या. यामध्ये पुण्यातून 55 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आणि 98 शिक्षक पुण्यात बदली होऊन आले, परंतु अद्याप 63 शिक्षक हे शाळेवर रुजूच झालेले नाहीत. त्यामुळे आहे तेवढ्या शिक्षकांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांच्या तात्पुरत्या सोईनुसार बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
एकूण मंजूर शिक्षक पदे 11,275
सध्या कार्यरत शिक्षक 11,275
रिक्त शिक्षक पदे 191
रिक्त पेसा अंतर्गत पदे 17
सध्या 191 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आंतरजिल्हा बदलीने आलेले केवळ 32 शिक्षक हजर झाले आहेत. सर्वजण हजर झाल्यावर रिक्त शिक्षकांची संख्या कमी होईल.
– संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प.