…गरिबांची दिवाळी झाली गोड, वितरण कंपनी खेडची असल्याने ‘आनंदाचा शिधा’चा 90 टक्के पुरवठा | पुढारी

...गरिबांची दिवाळी झाली गोड, वितरण कंपनी खेडची असल्याने ‘आनंदाचा शिधा’चा 90 टक्के पुरवठा

पुणे, पुढारी वृत्तसंस्था: शिंदे-फडणवीस सरकारच्या वतीने सर्वसामान्य व गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी शंभर रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येत आहे. दिवाळी सुरू झाली तरी पुणे जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागांत हा शिधा पोहचला नाही. ‘आनंदाचा शिधा’ वितरण करणारी कंपनी आणि यंत्रणा खेड तालुक्यातील म्हाळुंगे एमआयडीसीतील असल्याने खेड तालुक्यात 90 टक्के लोकांपर्यंत हा शिधा पोहचला असून, भाऊबीजपूर्वी सर्व पात्र लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

राज्य सरकारने सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी 100 रुपयांत एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ आणि एक लिटर पामतेल, असा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला. अंत्योदय व केशरी कार्डधारकांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असून, खेड तालुक्यात सुमारे 59 हजार कार्डधारक या योजनेचे लाभार्थी आहेत. यापैकी आतापर्यंत तब्बल 55 हजार पात्र लाभार्थ्यांपर्यंत ‘आनंदाचा शिधा’ पोहचला, तर शिल्लक लाभार्थ्यांना मंगळवारअखेर वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळेच भाऊबीजेपूर्वी खेड तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येणार आहे.

Back to top button