नाशिक : पुलाअभावी ते करताय पूरपाण्यातून प्रवास | पुढारी

नाशिक : पुलाअभावी ते करताय पूरपाण्यातून प्रवास

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
पाटणे येथील दत्तमंदिर ते धर्डादादा नगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण तसेच दत्त मंदिराजवळील परसूल नदीवर फरशी पूल बांधण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

हा रस्ता शेतकर्‍यांना शेतीकामासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. अक्षरशः रस्त्याची चाळण झाली. शेतमालाची वाहतूक करताना कमालीची कसरत करावी लागते. रस्त्याचे नूतनीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरणासह याच मार्गावर दत्तमंदिर शेजारील परसूल नदीवर पूल बांधण्यात यावा, यासाठी तीन वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. जुलै महिन्यातच परसूल धरण भरते. तेव्हा जुलै ते फेब्रुवारीपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी आव्हानात्मक ठरतो. विद्यार्थ्यांसह शेतकर्‍यांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो. लहान विद्यार्थी याच पाण्यातून शाळेसाठी ये-जा करतात. त्यातच पाटणे गावात आरोग्य सेवेसाठी जर दाखल व्हायचे असेल तर सात ते आठ किलोमीटरचा फेरा मारून गावात पोहोचावे लागते. ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन त्वरित पूल बांधून रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी निंबा बागूल, निंबा बच्छाव, केदा रोकडे, यशवंत चव्हाण, शिवाजी चव्हाण, उत्तम रोकडे, प्रमोद बागूल, मनोहर बागूल, शिवाजी बागूल आदींनी केली आहे.

हेही वाचा:

Back to top button