पृथ्वीवर एकूण किती मुंग्या आहेत? | पुढारी

पृथ्वीवर एकूण किती मुंग्या आहेत?

हाँगकाँग : आकाशातील तारे कुणी मोजू शकत नाही, तसेच पृथ्वीवरील काही प्रजातींचे जीवही आपण मोजू शकणार नाही, असेच आपल्याला वाटू शकेल. याबाबत अकबर-बिरबलाची एक गोष्टही आहे. शहरात किती कावळे आहेत, हे सांगत असताना चतूर बिरबलाने एक आकडा सांगितला होता. यामध्ये कमी कावळे भरले, तर ते दुसर्‍या शहरात पाहुणे म्हणून गेले असतील व जास्त भरले तर दुसर्‍या गावातील पाहुणे आपल्या शहरात आले असतील, असा त्याचा युक्तिवाद होता. यामधील विनोद व चातुर्याचा भाग सोडला, तर हा प्रकार किती कठीण आहे, हे आपल्याला समजू शकते, तरीही हाँगकाँगमधील एका विद्यापीठाच्या संशोधकांनी पृथ्वीवरील मुंग्यांची एकूण संख्या सांगितली आहे.

यूनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगच्या संशोधकांच्या मते पृथ्वीतलावर 20,00,00,00,00,00,00,000 इतक्या मुंग्या आहेत (हुश्श!). नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेज जर्नलच्या पीयर-रिव्ह्यू प्रोसिडिंग्जमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार वैज्ञानिकांनी जगभरातील सुमारे 500 मुंग्या समूहांच्या अध्ययनांच्या विश्लेषणानंतर हा आकडा ठरवला आहे.

वर्ल्ड बँकेनुसार पृथ्वीवर मानवी लोकसंख्या 7.8 अब्ज आहे आणि पृथ्वीवरील मुंग्यांची संख्या जवळजवळ प्रतिव्यक्ती 2.5 दशलक्ष इतकी आहे. हा आकडा मुंग्यांच्या यापूर्वीच्या वैश्विक लोकसंख्येच्या अनुमानापेक्षा वीसपट अधिक आहे. जगभरात मुंग्यांच्या 15,700 प्रजाती-उपप्रजाती आहेत.

Back to top button