सांगली : वाळवा तालुक्यात 18 गावांत लम्पी | पुढारी

सांगली : वाळवा तालुक्यात 18 गावांत लम्पी

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यात लम्पीचा प्रादूर्भाव वाढत आहे. 18 गावांमध्ये लम्पीबाधित 72 जनावरे आढळली आहेत. पशुसंवर्धन विभागातर्फे तालुक्यात तीन उपचार केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. येथून लम्पीबाधित जनावरांवर मोफत उपचार सुरू आहेत. दि. 3 सप्टेंबररोजी शेखरवाडी परिसरात लम्पीबाधित गाई आढळल्या होत्या. त्यानंतर शिरटे, कणेगाव, चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द, लाडेगाव, येलूर, इटकरे, भडकंबे, आष्टा, बागणी, पोखर्णी, गोटखिंडी, कि.म.गड, ओझर्डे, करंजवडे आदी गावात लम्पीने शिरकाव केला आहे.

लम्पी साथीला रोखण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने शेखरवाडी, आष्टा, इस्लामपूर 3 उपचार केंद्रे स्थापन केली आहेत. तेथे दोन पशुधन
विकास अधिकार्‍यांबरोबर पशुधन पर्यवेक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. बाधित जनावरांवर पशुवैद्यकीय विभागामार्फत मोफत उपचार करण्यात येत आहेत. राजारामबापू दूध संघ, वारणा दूध संघ, खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांची मदत घेण्यात आली आहे. 70 टक्के जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. बाधित जनावरांना क्वारंटाईन करावे. परिसरात कीटकनाशकांची फवारणी करावी. गोठ्यामध्ये
सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करावी. लम्पीची लक्षणे दिसताच पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाने केले आहे.

पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन वंजारी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, पशुधन विकास अधिकारी डॉ. सतीश गोसावी, डॉ. वैजयंती टेकाडे, डॉ. कपिल खंडाळे, डॉ. अश्विनी गिरीगोसावी, डॉ. वसुधा कदम, डॉ. महादेव चव्हाण, डॉ. हेमंत मोरे, डॉ. अंबादास माडकर, डॉ. शुभांगी देवकर, डॉ. धनश्री होवाळ, सहाय्यक पशुधन अधिकारी डॉ. अशोक गायकवाड, डॉ.प्रकाश कोळी,
डॉ. रामचंद्र गुरव आदींची पथके तालुक्यात कार्यरत आहेत

पशुसंवर्धन विभागाकडील रिक्त पदांमुळे ताण येत आहे. तालुक्यात लसीकरणच्या मोहीमला प्राधान्य देण्यात आले आहे. तालुक्यात एकही पशुधन लम्पीने दगावलेले नाहीत. साथ नियंत्रणात आहे.
– डॉ. सचिन वंजारी
सहाय्यक आयुक्त- पशुसंवर्धन विभाग

Back to top button