वाहनचालकांना नाशिकमध्ये प्रशिक्षण : खा. हेमंत गोडसे | पुढारी

वाहनचालकांना नाशिकमध्ये प्रशिक्षण : खा. हेमंत गोडसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासह इंधन बचतीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तेल इंडस्ट्रीने विशेष प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रातून राज्यभरातील चालकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यासाठी इगतपुरीमधील मुंढेगाव किंवा पाडळी देशमुख येथील जागा निश्चिती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

राज्यात दररोज मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, त्यामध्ये अनेक प्रवाशांचा बळी जात आहे. अनेकांच्या नशिबी कायमचे अपंगत्व येत आहे. तसेच चालकांनी योग्य प्रशिक्षण घेतले नसल्याने लाखो लिटर इंधनही वाया जाते. या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गोडसे यांनी ना. गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार ना. गडकरी यांनी चालकांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे आदेश दिले असून, त्याची जबाबदारी भारत पेट्रोलियम कंपनीला देण्यात आली आहे. नागपूर येथे पहिल्या टप्प्यात अशा प्रकारचे केंद्र उभारल्यानंतर राज्यातील दुसरे केंद्र इगतपुरीत सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहे. केंद्रासाठी 15 एकर शासकीय जागा लागणार असून, सुमारे 20 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. केंद्रासाठी पाडळी देशमुख किंवा मुंढेगाव शिवारात जागानिश्चिती अंतिम टप्प्यात आहे. इंधन बचतीचे धडे आणि प्रशिक्षण दिले जाईल, असेही गोडसे यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button