नानगाव : मळीमिश्रित सांडपाण्यामुळे भूगर्भातील पाण्यावर परिणाम | पुढारी

नानगाव : मळीमिश्रित सांडपाण्यामुळे भूगर्भातील पाण्यावर परिणाम

राजेंद्र खोमणे
नानगाव : गुर्‍हाळासाठी वापरण्यात येणारे पाणी तसेच गुर्‍हाळातील मळीमिश्रित सांडपाणी परिसरात शेतात किंवा रस्त्याच्या बाजूला असलेल्या चार्‍यांमध्ये सोडण्यात येते. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येते, तसेच हे खराब व मळीमिश्रित पाणी जमिनीत पाझरल्याने जमिनीतील चांगल्या पाण्यात मिसळते, त्यामुळे भूगर्भातील पाण्याची प्रतवारी बिघडत असल्याने भविष्यात या पाण्याचे वाईट परिणाम दिसून येणार असल्याची वस्तुस्थिती आहे.

पाण्याची व्यवस्थित विल्हेवाट न लावल्यामुळे हे खराब व मळीमिश्रित पाणी परिसरात जमिनीमध्ये मुरते आणि भूगर्भातील चांगल्या पाण्याच्या स्रोतात ते मिसळले जाते. भीमा नदीपट्ट्यात व परिसरातील गावागावात मोठ्या प्रमाणावर गुर्‍हाळांची संख्या असल्यामुळे जमिनीतदेखील जास्त प्रमाणात मळीमिश्रित सांडपाणी मुरत असते. सध्या जरी नागरिक फिल्टर पाणी पिण्यासाठी वापरत असले तरी काही नागरिक आपल्याच भागातील बोअरवेल, विहीर याचेच पाणी पितात. त्यामुळे गुर्‍हाळांची संख्या ज्या ठिकाणी जास्त असेल, त्या ठिकणच्या पाण्याच्या स्रोतामध्ये हे मळीमिश्रित सांडपाणी मिसळते, नागरिकांना खराब पाण्यामुळे आजारालाही सामोरे जावे लागत असावे.

गुर्‍हाळ व्यवसाय सुरू करताना अन्न व औषध प्रशासन विभागाला व्यवसाय करणार्‍या भागातील पाण्याचा तपासणी अहवाल, गुर्‍हाळावरील कामगारांची आरोग्य तपासणी अहवाल द्यावा लागतो. जर याच ठिकाणी वर्षोनुवर्षे हे सांडपाणी जमिनीत मुरत असेल तर काही दिवसांनी या पाण्याचा अहवाल कशा प्रकारचा असेल ? तसेच जर पाणी खराब होत असेल व परिसर अस्वच्छ असेल तर नक्कीच या ठिकाणचे कामगार सतत आजारी पडत असतील. मात्र किती वेळा गुर्‍हाळ व्यावसायिक अशा कामगारांची आरोग्य तपासणी करत असतील हे सांगणे जरा कठीणच आहे.

दिवसेंदिवस गुर्‍हाळांची वाढती संख्या आणि जमिनीत मुरणारे सांडपाणी व मळीमिश्रित पाणी यामुळे दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याचा स्रोत खराब होत चालला आहे. याचा वाईट परिणाम परिसरातील विहिरी, बोअरवेल यांच्यावर होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जोपर्यंत जमिनीवर हे सांडपाणी आहे तोपर्यंत घाणीचे साम—ाज्य आणि दुर्गंधीने नागरिक हैराण होत आहे. आणि जेव्हा हेच सांडपाणी व मळीमिश्रित पाणी जमिनीत मिसळून भूगर्भातील पाण्यात मिसळते तेव्हादेखील या खराब पाण्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे शेतकरी व नागरिक  बोलून दाखवतात.

आजारी असताना मजूर कामावर
गुर्‍हाळ परिसरात वाढत चालेली अस्वच्छता तसेच कामात होणार्‍या जखमा यामुळे कामगार बर्‍याच वेळा आजारी असतात. गावातील दवाखाने पाहिले तर यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुर्‍हाळात काम करणारे कामगार दिसून येतात. आजारी असूनदेखील हे कामगार त्याच परिस्थितीत गुर्‍हाळावर काम करत असतात, मात्र अन्न बनविताना कामगार हे निरोगी असणे आवश्यक आहे. मात्र याकडे पाहणार तरी कोण ?

 

Back to top button