भारतीय महिलांचा दमदार विजय | पुढारी

भारतीय महिलांचा दमदार विजय

व्होव वृत्तसंस्था :  उपकर्णधार स्मृती मानधना (91), कर्णधार हरमनप्रीत कौर (74) आणि यष्टिरक्षक यास्तिका भाटिया (50) यांच्या दमदार खेळींच्या जोरावर भारतीय महिला संघाने इंग्लंडवर 7 विकेटस्नी शानदार विजय मिळवला. या विजयाने भारताला वन-डे मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळाली आहे. भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिची ही शेवटची मालिका आहे. स्मृतीला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला.

भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत इंग्लंडच्या बॅटरना सुरुवातीपासूनच जास्त मोकळीक दिली नाही. 94 धावांत त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला होता. पण डॅनी वेट्ट (43) आणि अ‍ॅलिस डेव्हीडसन (नाबाद 50) यांच्यासह तळाच्या बॅटर्सनी चांगली फलंदाजी केल्यामुळे इंग्लंडला 7 बाद 227 धावा करता आल्या. झुलन गोस्वामीने दहा षटकांत फक्त 20 धावा देत 1 विकेट घेतली.

इंग्लंडचे आव्हान पेलताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शेफाली वर्मा (1) दुसर्‍या षटकांत बाद झाली, पण त्यानंतर स्मृती मानधना आणि यास्तिका भाटिया यांनी 98 धावांची भागीदारी केली. अर्धशतकानंतर यास्तिका बाद झाली. त्यानंतर उपकर्णधाराच्या जोडीला कर्णधार आली. दोघींनी बरोबर शंभर धावांची भागीदारी करताना संघाला विजयाच्या समीप आणून ठेवले; परंतु शतकाजवळ
पोहोचलेली स्मृती 91 धावांवर बाद झाली. यानंतर हरमनप्रीतने हरलीन देवोलच्या साथीने 43 व्या षटकांत विजय साकारला.

Back to top button