नाशिक : महिला सुधारगृहातील तरुणींसाठी काैशल्य सेंटर | पुढारी

नाशिक : महिला सुधारगृहातील तरुणींसाठी काैशल्य सेंटर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कुशल मनुष्यबळ ही काळाची गरज आहे. त्यामुळे ज्याच्याजवळ कुशल मनुष्यबळ आहे, त्यांनी ते सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. एम्पॉवरमेंट ब्यूरो विभागाची तुम्ही मदत घेऊ शकता. त्यांच्या साह्याने राज्यामध्ये तुम्ही छोटे कौशल्य विकास सेंटर सुरू करावे. इंक्युबॅशन सेंटर सुरू करावे. तरुणांना प्रशिक्षित करून उद्योग व्यापार करण्यासाठी मदत करावी. महिला सुधारगृहातील महिला व तरुणींसाठी कौशल्य सेंटर सुरू करावे, असे आवाहन पर्यटन व कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे राज्यस्तरीय परिषदेत युवा सक्षमीकरणासाठी कौशल्य विकासाची भूमिका आणि राष्ट्र निर्माण या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी होते. ना. लोढा म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचा कौशल्यविकास विभाग तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल तसेच महिला बालविकास विभागाचे काम माझ्याकडे असून, एक लाख 10 हजार अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांना आपण मदत करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. प्रास्ताविकात ललित गांधी म्हणाले की, राज्यातील व्यापार, उद्योगाला जागतिक स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र चेंबरच्या महोत्सवी वर्षापर्यंतच्या ६ वर्षांची ब्ल्यू प्रिंट सादर केली. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या ६ विभागांसाठी महिला उद्योजिका क्लस्टर, कृषिपूरक उद्योगांचे क्लस्टर व उत्पादन आधारित उत्पादनांचे ६ क्लस्टर चेंबरच्या पुढाकाराने उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, शुभांगी तिरोडकर, रवींद्र मानगावे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर पुनाळेकर, तनसुख झांबड, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन विजय कलंत्री उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button