धुळे : कंत्राटी कामगारांचे आ. मंजुळा गावित यांना साकडे, केल्या ‘या’ मागण्या | पुढारी

धुळे : कंत्राटी कामगारांचे आ. मंजुळा गावित यांना साकडे, केल्या 'या' मागण्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा

आरोग्य यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्यात यावे व अंशकालीन कर्मचारी घोषित करून शासनाच्या विविध विभागातील जागा कोरोना कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी आज कंत्राटी कामगारांनी जिल्हा रुग्णालयात निदर्शने केले. यावेळी स्वच्छता अभियानासाठी आलेल्या साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित यांना या कामगारांनी मदत करण्यासाठी साकडे घातले आहे.

या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केल्यानंतर प्रशासनासमोर आपली बाजू मांडली. कोरोनाचा प्रकोप असताना आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या कामगारांनी आज रुग्णालयात निदर्शने करीत आपला रोष व्यक्त केला. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात स्वच्छता करण्यासाठी ठेका देत असताना या कोरोना योद्धांना समाविष्ट करून देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

राज्यात कोरोनाचे संकट वाढत असताना आरोग्य विभागाने संपूर्ण राज्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली. कोरोनासारख्या महामारीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्याच्या आरोग्य विभागात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा दिली. कोरोनाच्या परिस्थितीत नातेवाईक आपल्या रुग्णांना बेवारस स्थितीत सोडून जात होते. अशांना सेवा व आधार देण्याचे काम धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ठेका पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले. या कर्मचाऱ्यांना मोठ्या वाजा गाजाने कोरोना योद्धा म्हणूनही सन्मानित करण्यात आले. मात्र कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली, तेव्हा या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. आज सर्व कर्मचाऱ्यांवर कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करत आहे. सध्या स्थितीत हिरे मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात 71 पदे रिक्त आहेत. या पदावर आमचा विचार करावा. आमच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावे. आरोग्य विभागातील रिक्त पदी नेमणूक करून कायमस्वरुपी किंवा एनएचएम रोजगाराची संधी उपलबध करून द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयात आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाला साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावीत यांनी हजेरी लावली. यावेळी या कामगारांनी आमदार गावित यांच्या समोर देखील आपली व्यथा मांडली. त्यानुसार स्वच्छतेच्या कामात सेवा बजवणाऱ्या या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन आ. गावीत त्यांनी यावेळी दिले. यावेळी कर्मचारी स्वप्निल येदवर, आकाश सोनवणे, विठ्ठल पाटील, निलेश पाटील, फिरोज शैख, भूषण पाटील, दिनेश पठारे, सुशील पवार, समाधान बागुल, मनोहर खैरनार, मयूर खाटीक, मनीषा खामगड, उज्वल मोरे, राकेश वाघ, उमेश मोरे, महेश खैरनार, निलेश कुंभारे, संदीप सोनावणे, राखी मोरे उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button