गोतोंडीतील अस्तरीकरणाचे काम पाडले बंद | पुढारी

गोतोंडीतील अस्तरीकरणाचे काम पाडले बंद

शेळगाव; पुढारी वृत्तसेवा: निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणासाठी सुरू असलेले मुरूम टाकण्याचे काम गोतोंडी ग्रामस्थांनी व शेतकर्‍यांनी बंद पाडले. या संदर्भात शुक्रवारी (दि. 16) बारामतीत होणार्‍या बैठकीत पुढील निर्णय घेऊ अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. सध्या गोतोंडी येथील निरा डावा कालव्यावर अस्तरीकरणासाठी मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे.

ते काम गोतोंडीचे सरपंच गुरुनाथ नलवडे यांच्यासह ग्रामस्थ शेतकर्‍यांनी बंद पाडले. त्यानंतर दुपारी जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता अश्विन पवार व शाखा अभियंता आर. डी. झगडे यांनी गोतोंडी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन शेतकरी व ग्रामस्थांशी या विषयावर चर्चा केली.

या वेळी ग्रामस्थांनी अस्तरीकरण केल्यास पाझर बंद होऊन विहिरी आटतील तसेच येथील तीन ओढ्यांचा पाझर बंद झाल्यास त्याखालील शेतीचे फार मोठे नुकसान होणार आहे, तसेच पाणीपुरवठा योजनेला देखील त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे ते काम होऊ नये अशी भूमिका मांडली. या वेळी सहाय्यक अभियंता अश्विन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार गोतोंडी हद्दीत तीन पॅच असून फक्त 750 एवढेच अस्तरीकरण होणार आहे. त्याखाली प्लास्टिकचा कागद नाही, शिवाय चार इंचाचा थर आहे.

त्यामुळे 100 टक्के पाझर बंद होणार नाही. येथील पाणीपुरवठा योजनेला अडचण येणार नाही व ओढ्याच्या पाझराचा प्रश्न वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगतो, असे आश्वासन दिले. शुक्रवारी बारामती येथे आंदोलक व जलसंपदा विभागाचे जबाबदार अधिकारी यांच्यात अस्तरीकरण या विषयावर होणार्‍या बैठकीस आम्ही उपस्थित राहू व त्यानंतर येथील कामाबाबत निर्णय घेऊ अशी भूमिका या वेळी सरपंच गुरुनाथ नलवडे आदींसह शेतकर्‍यांनी व ग्रामस्थांनी घेतली. या वेळी आप्पा पाटील, विठ्ठल पापत, कैलास पाटील, बंडू काळे, अंकुश माने, शिवराम बनकर, माणिक माने, सचिन नलवडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Back to top button