ईडीकडून आरोपपत्र दाखल : खडसे कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता | पुढारी

ईडीकडून आरोपपत्र दाखल : खडसे कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता

मुंबई; पुढारी ऑनलाईन : खडसे कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता : पुणे येथील भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी गैर व्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) याप्रकरणी आरोपपत्र ईडीच्या विशेष न्यायालयात दाखल केले आहे.

खडसे कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता

त्यामुळे खडसे कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने याप्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, ईडीने एकनाथ खडसे यांची चौकशी केली असून त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांना दोन वेळा चौकशीला बोलावले होते.

सीडी योग्य वेळी दाखवणार

त्यांनी ईडी लावली तर आम्ही सीडी लाऊ या गाजलेल्या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनी आपण पोलिसांकडे सीडी दिली असून योग्य वेळी दाखवणार असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी प्रतिक्रिया दिली होती.

ईडी लावली तर सीडी लावेन असं मी म्हणालो होतो. हे खरं आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच मी हा अहवाल जाहीर करणार आहे, असं खडसे म्हणाले.

जे भ्रष्टाचार करतात, गैरव्यवहार करतात त्या लोकांवर आम्ही कारवाई करतो, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

त्यामुळे मला अपेक्षा आहे की दादांनी त्यांच्या शेजारी बसणाऱ्या लोकांची चौकशी करावी.

त्यांनी माझी ईडीची चौकशी लावली हे चंद्रकांतदादांनी मान्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

विधानसभेत मी वारंवार विचारलं माझा दोष काय आहे ते सांगा. आता ईडीने चौकशी लावली. ती कोर्टात काय व्हायचं ते होईल, असंही त्यांनी सांगितलं.

गेल्या ४० वर्षात माझ्यावर एकही आक्षेप आलेला नाही. राजकारणात कधीही कुणी माझ्याविरोधात काही बोललेलं नाही. पण जमिनीबाबत माझ्यावर हेतूपुरस्सर आरोप करण्यात आला.

हे ही वाचलं का?

Back to top button