

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक, तरुणांसह आता गर्भवतींसह स्तनदा मातांच्या लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. ही लस पूर्णतः सुरक्षित आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य विभागासह बालरोग आणि स्त्रीरोग तज्ज्ञांनी केले.
प्रसूतिपूर्व आणि प्रसूतिपश्चात गंभीर धोके यामुळे टळत असल्याचा निर्वाळा वैद्यकीय तज्ज्ञांनी दै. 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला. शहरातील 955, तर ग्रामीण भागातील 1390 महिलांना हा डोस देण्यात आला आहे. लसीकरणासाठी आरोग्य प्रशासनाने नेटके संयोजन केले आहे. गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी शहरात 13, तर ग्रामीण भागात 106 केंद्रांवर लसीकरण केले जाते. त्यासाठी सोमवार हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.
शहरातील या लाभार्थ्यांसाठी पंचगंगा हॉस्पिटल येथे प्रत्येक सोमवारी प्राधान्याने लसीकरणची खास सोय केली आहे. शहरातील 341 गर्भवतींचे, तर 614 स्तनदा मातांचे लसीकरण झाले आहे. ग्रामीण भागातील 1 हजार 390 गर्भवतींनी पहिला डोस घेतला असून, 25 महिलांनी दुसरा डोस घेऊन लसीकरण पूर्ण केले आहे. लसीकरणानंतर एकाही लाभार्थी महिलेला कोणताही त्रास झाला नसल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यात 68 हजार 347 गर्भवती आहेत.
गर्भवतींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना फॉक्सी, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन पेडियाट्रिक असोसिएशन या खासगी वैद्यकीय क्षेत्रातील संघटनेच्या पदाधिकार्यांची 'कोव्हिड व्हॅक्सिनेशन इन प्रेग्नंंट वुमन' या विषयावर नुकतीच कार्यशाळा झाली. यामध्ये तज्ज्ञांनी ही लस गर्भवतींसह स्तनदा मातांना सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.
स्तनदा माता कोरोनाबाधित असेल तरी तिने कोरोनापासून सुरक्षितता बाळगून बाळाला अंगावरचे दूध पाजावे. मात्र, ती कोरोनाबाधित नसले तर तिने कोरोनाप्रतिबंधक लस घ्यावी. लसीकरणानंतर बाळाला दूध पाजण्यास काहीच हरकत नाही. या लसीकरणामुळे प्रसूती काळातील गुंतागुंत कमी होते.
– डॉ. संगीता कुंभोजकर
अध्यक्षा, बालरोग कोरोना स्टास्क फोर्सगर्भवतींसाठी कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असून, ती घेणे गरजेची आहे. प्रसूती काळात संबंधित महिला कोरोनाबाधित असेल तर बाळासह आईला धोका असतो. प्रसूती काळातील गुंतागुंत आणि धोके टाळ्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे.
– डॉ. गीता पिलाई, स्त्रीरोगतज्ज्ञ
गर्भवतींची लसीकरण स्थिती
पहिला डोस व कंसात दुसरा डोस
आजरा- 109 (0), भुदरगड- 84 (3), चंदगड – 63 (2), गडहिंग्लज – 10(0), गगनबावडा – 46 (0), हातकणंगले -249(1), कागल- 106 (7), करवीर – 179 (11), पन्हाळा – 252 (0), राधानगरी – 131 (0), शाहूवाडी- 35 (1), शिरोळ – 126 (0), कोल्हापूर शहर – 341 (0).